नंदुरबार – नंदुरबार : जिल्ह्यात कुपोषणाचे वाढते प्रमाण खरोखर चिंताजनक आहे. कुपोषणाला १०० टक्के हद्दपार करण्यासाठी विशेष लक्ष देणार असून विविध योजना प्रभावीपणे राबविणार आहोत, असे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री भारती पवार यांनी सांगितले. नंदुरबार येथे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी खा.डॉ.हीना गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते. त्या पुढे बोलतांना म्हणाल्या, कुपोषणाला १०० टक्के हद्दपार करण्यासाठी दर्जेदार पोषण आहार पुरविण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात केंद्राकडून आलेला पैसा पडून आहे. एका बाजूला केंद्र सरकार मदत करत नसल्याची ओरड केली जाते तर दुसऱ्या बाजूला मिळालेला पैसा देखील खर्च होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत याचा जाब विचारणार असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज श्रीमती पवार यांनी व्यक्त केली. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. असे असले तरी मुख्यमंत्र्यांकडून यावर टीका होत आहे. खरे तर जनतेत गेल्याशिवाय जनतेचे प्रश्न समजणार नाहीत. यामुळे घरात बसून टीका करणाऱ्यांनी राजकारण करु नये, असे श्रीमती पवार म्हणाल्या.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा दिंडोरीच्या खासदार डॉ.भारती पवार यांचे भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. मंत्री डॉ.पवार यांच्यासह जनआशीर्वाद यात्रेचे बुधवारी रात्री येथील साक्री नाक्यावर आदिवासी पथकाने पारंपारिक नृत्याद्वारे स्वागत केले. रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. खा.डॉ.हिनाताई गावित, अनुसुचित जमाती महाराष्ट्र राज्य प्रमुख किशोर काळकर, माजी यांसह भाजपाचेे पदाधिकारी उपस्थित होते.