नंदुरबार – कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा नवीन प्रकार काही देशांमध्ये झपाट्याने वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत तातडीची बैठक घेऊन त्याची लक्षणे तसेच विविध देशांमध्ये दिसलेल्या त्याच्या प्रभावाविषयी माहिती घतली. तसेच सर्व राज्य सरकारांना अलर्ट करण्यात आले. अद्याप कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा नवीन प्रकार भारतात आढळलेला नाही.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या ताज्या अपडेट नुसार 27 नोव्हेंबर 2021 रात्री 9 वाजेपर्यंत झालेल्या एकूण 376 चाचण्यांपैकी 3 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नंदुरबार शहरातील संजय नगर ,सूर्यवंशी नगर, कुंभारवाडा या भागातून हे 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांचा आणि मृत्यूचा तक्ता शून्यावर आलेला होता. तथापि या ताज्या अहवालामुळे कोरोना रुग्ण एकेक करून वाढू लागल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना संपला असे मानून बिनधास्त फिरणाऱ्यांना हा गंभीर ईषारा आहे.
नवी दिल्ली येथे भारत सरकार कडून प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल दि. 27 रोजी सकाळी कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि लसीकरण संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुमारे 2 तास सर्वंकष बैठक झाली. पंतप्रधानांनी कोविड-19 प्रकरणांशी संबंधित राष्ट्रीय परिस्थिती आणि चाचणी संसर्ग दरांचाही आढावा घेतला.
अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना ‘ओमिक्रॉन’ हा विषाणूचा नवीन प्रकार आणि त्याची लक्षणे तसेच विविध देशांमध्ये दिसलेल्या त्याच्या प्रभावाविषयी माहिती दिली.विषाणूच्या या स्वरूपाचे भारतावर होऊ शकणााऱ्या परिणामांबाबतही चर्चा करण्यात आली. विषाणूच्या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सक्रिय पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन धोक्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आणि मास्क लावणे आणि सामाजिक अंतर यांसारखी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे असे पंतप्रधान म्हणाले. ‘धोका ‘ असल्याचे निश्चित करण्यात आलेल्या देशांवर विशिष्ट लक्ष केंद्रित करून सर्व भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची, मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची चाचणी करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. विषाणूचा नवा प्रकार उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर,आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कमी करण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्याच्या सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पंतप्रधानांना लसीकरणातील प्रगती आणि ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. देशात वेळोवेळी करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणातून समोर आलेला संसर्ग दर आणि त्याचा सार्वजनिक आरोग्य प्रतिसादावरील परिणाम याबद्दल पंतप्रधानांना तपशील देण्यात आला.
राज्य आणि जिल्हा स्तरावर योग्य जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकारांसोबत काम करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोविडचे मोठ्या संख्येने रुग्ण नोंदवणाऱ्या समूहांमध्ये कठोर प्रतिबंध आणि सक्रिय देखरेख ठेवणे सुरू ठेवावी आणि सध्या जास्त रुग्ण नोंदवणाऱ्या राज्यांना आवश्यक तांत्रिक सहाय्य दिले जावे, असेही निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. वायुवीजन आणि हवेतून पसरणाऱ्या विषाणूच्या वर्तनाबद्दल जनजागृती करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
नवीन औषधोत्पादनासंबंधीत उत्पादनांसाठी एक सोयीस्कर दृष्टिकोन अवलंबत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. विविध औषधांचा पुरेसा अतिरिक्त साठा असल्याची खात्री करण्यासाठी पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.
पीसीए ऑक्सिजन सयंत्रे आणि व्हेंटिलेटर्सचे योग्य कार्यान्वयन कायम राहण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना राज्यांशी समन्वय साधण्यास सांगितले.