मुंबई – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेप्रसंगी महारष्ट्र राज्यात बाधित झालेल्यांमध्ये तरुणांची व मध्यमवयीनांची संख्या अधिक होती. परंतु राज्यातील वृद्धांची संख्या लक्षात घेता ८१ ते ९० वयोगटातील बाधितांची टक्केवारी सर्वाधिक प्रमाणात होती. महाराष्ट्र राज्याच्या जनआरोग्य विभागाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्धीसाठी दिलेल्या अहवालातून अशी माहिती प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार असे भाकीत सध्या काही आरोग्यतज्ज्ञ करीत आहेत. मात्र तेवढ्याच जोरकसपणे महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील अधिकारी तिसरी लाट येणार नसल्याचे स्पष्ट करीत आहेत. तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देता येईल अशी जय्यत पूर्व तयारी झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान ; १ फेब्रुवारी २० ते १ सप्टेंबर २०२१ या कालावधीत कोविड-१९ मुळे झालेले मृत्यू आणि झालेले बाधित यांची जी नोंद सरकार दरबारी झाली, त्यावर आधारलेला अहवाल महाराष्ट्र राज्याच्या जन आरोग्य विभागाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगात २१ कोटी ८९ लाख ४६ हजार ८३६ रुग्ण आढळले. पैकी भारत देशात ३ कोटी २९ लाख ४५ हजार ९०७ रुग्ण होते. तर महाराष्ट्रात एकूण ६४ लाख ७७ हजार ९८७ रुग्ण होते. त्या रुग्णांपैकी भारतात ४ लाख ४० हजार २२५ मृत्यू तर महाराष्ट्रात १ लाख ३७ हजार ६४३ मृत्यू झाले. देशात सर्वाधीक बाधित केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून आले होते. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या 11 कोटी 19 लाख 66 हजार 637 असून यापैकी 5.79% म्हणजे 64 लाख 83 हजार 471 बाधित झालेे होते.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहवालात या संबंधित दिलेल्या आलेखांवर नजर टाकली असता तरुण वयातील बाधितांचा आलेख उंचावर दिसतो. बाधितांच्या वयोगटनिहाय दिलेल्या स्तंभात दर्शविल्यानुसार महाराष्ट्रातील 31 ते 40 वयोगटातील तरूणव्यक्ती सर्वाधिक बाधित झाल्या होत्या. या वयोगटातील सुमारे 14 लाख 43 हजार व्यक्ती बाधित होत्या. 21 ते 30 वयोगटाचे 11लाख 64 हजार 209 जण तर 41 ते 50 वयाचे 11लाख 59 हजार, 51 ते 60 वयाचे 9 लाख 34 हजार 35 रुग्ण होते.
तथापि वृद्ध वयाच्या रुग्णांचा आलेखही अधिक लक्ष वेधून घेणारा आहे. त्यात दर्शविले आहे की राज्यभरातून 61 ते 70 वयोगटातील 6 लाख 61 हजार 209 रुग्ण होते. 71 ते 80 वयो गटातील 3 लाख 24 हजार 529 रुग्ण होते. 81 ते 90 वयोगटातील वृद्धांची संख्या महाराष्ट्रात 6 लाख 1 हजार 113 असून यापैकी तब्बल 15% म्हणजे 92 हजार 782 जण बाधीत झाले. नव्वदी ओलांडलेले 13 हजार 298 तर शंभरी च्या पुढे गेलेले 2 हजार 276 जण बाधित होते.