नंदुरबार : कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत शासनाकडून मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रमाणित दाखले वितरीत करण्यात आज मोठा गोंधळ ऊडाला. त्याची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र शिंदे यांनी तातडीने प्रमाणित दाखले ऑनलाइन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. तसेच मृतांचे आरटीपीसीआर व अन्य नोंदी प्रमाणित करून देण्यासाठी खास कमिटी नियुक्त केली आहे. यामुळे कोरोना मुळे मरण पावलेल्या नागरिकांच्या नातलगांनी प्रमाणित दाखले घेण्यासाठी काउंटरवर गर्दी करण्याची आवश्यकता नाही; असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत वितरीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोर्टल सुरु केले आहे. त्या वेबपोर्टलवर कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आणि मयत प्रमाणपत्र आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक चौकशी होण्याची शक्यता असल्याने रुग्णालय प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ९५१ जणांची माहिती अपडेट करून ठेवली आहे. यातून त्यांच्या वारसांकडून प्रमाणपत्र मागणी करण्यात आल्यानंतर काही क्षणात ती वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानुसार आज पोर्टलवरील प्रमाणित दाखले मिळवताना आरटीपीसीआर रिपोर्ट तसेच मयत दाखल्यासाठी वारसांची फिरफिर होवू नये, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून कामकाज सुरु केले. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांकडून ते रिपोर्ट हाती घेणाऱ्यांनी एकच गर्दी केली. आज दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी त्याठिकाणी रिपोर्ट शोधणाऱ्यांनी प्रचंड सावळागोंधळ केला. अनेक रुग्णांशी संबंधित त्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा अक्षरशः ‘उकिरडा’ करून इतस्ततः पसरविल्याचे पहायला मिळाले. काही संतप्त लोकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
या सर्व पार्श्वभूमीवर दुपारी चार वाजता तातडीची बैठक घेण्यात आली. कमिटी नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला. Rt-pcr निगेटिव्ह असूनही ज्यांना कोविड रुग्ण म्हणून ऊपचार केले गेले, त्यांच्या कागदपत्रांची तसेच तत्कालीन नोंदींची पडताळणी केली जाईल. त्याचबरोबर आरटीपीसीआर निगेटीव परंतु मृत्यू covid-19 ने झाले, त्यांच्या नोंदी व दाखल्यांची देखील स्क्रुटीनी करण्याचे काम ही कमिटी करणार आहे. तथापि येथून पुढे सर्व रुग्णांचे दाखले व नोंदी ऑनलाईन प्रमाणित करून दिले जातील व नागरिकांना ते ऑनलाईनच उपलब्ध होतील अशी व्यवस्था या कमिटीच्या माध्यमातून केली जात आहे; अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांनी दिली आहे.