नंदुरबार : ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटिया लिखित ‘क्रांतीकारक खाज्या नाईक यांचा गौरवशाली इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्षडॉ. हर्ष चव्हाण यांच्या हस्ते झाले. डॉ.कांतिलाल टाटिया हे आदिवासी संशोधन संस्थेचे तसेच आदिवासी उपाय योजना अभ्यास गटाचे माजी संचालक आहेत.
नंदुरबार येथे अभाविप चे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन बाल हुतात्मा शिरिष कुमार नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाले. त्या अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. हर्ष चौहान यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिनेअभिनेते श्री.योगेश सोमण, अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. आशिष चौहान, स्वागत समिती अध्यक्ष सौ. ईला गावित,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भय विसपुते, प्रदेश मंत्री श्री. अनिल ठोंबरे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी प्रदेश मंत्री कु. अंकिता पवार, शहर मंत्री जयेश सोनवणे तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित, खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार राजेश पाडवी, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, निर्भय विसपुते, अंकिता पवार, प्रा. डॉ. गिरीश महाजन, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. टाटीया यांनी आदिवासी क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या जीवन चरित्रावर आधारित या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यात खाज्या नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याचे तसेच अंबापाणीच्या लढ्याची विस्तृत माहिती दिली आहे.
आदिवासी क्रांतिकारकांची थोडक्यात पार्श्वभूमी
डॉ. टाटीया यांनी सांगितले की, अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात खानदेशातील क्रांतिकारक खाज्या नाईक यांनी ब्रिटीशांशी दिलेला लढा हा गौरवशाली इतिहास आहे. त्यातच आंबापाणी चे 11 एप्रिल1858 चे युद्ध सर्वार्थाने रोमांचकारी आहे. हे युद्ध सात तास चालले आधुनिक शस्त्रे विरुद्ध जुने शस्त्र, प्रशिक्षित सैनिक विरुद्ध प्रशिक्षित नसलेले सैनिक, पगारी सैनिक विरुद्ध सन्मानासाठी स्वातंत्र्यासाठी लढणारे सैनिक, इंग्रजांकडे तोफा होत्या तर खाज्या नाईकांकडे लढण्याची जिद्द होती, असा हा सामना वाचतांना सुद्धा रोमांच उभे राहतात. इंग्रजांनी आपले साम्राज्य ,सत्ता अबाधित राहावी म्हणून दहशत तंत्राचा भिल्लांवर खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला. वस्त्यांच्या वस्त्या जाळणे, महिला पुरुषांना जिवंत जाळणे, त्यांच्या नायकांना पकडून चौकात फाशी देणे, जेलमध्ये टाकून सश्रम कारावासाच्या यातना देणे, एवढ्यावरच न थांबता “ड्रम ट्रायल” द्वारे हात बांधून गोळ्या झाडून मारणे, अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला पाठवणे, असे सर्व प्रकार ब्रिटिशांनी अवलंबले. या लढ्याची विशेषता अशी की भिल्लां बरोबर त्यांच्या स्त्रिया सुद्धा खांद्याला खांदा लावून लढल्यात. त्यांना जेलमध्ये सुद्धा जावे लागले. भिल्लांच्या प्रमुखांना किंवा उठावात भाग घेणा-यांचे जीवन संपवून ब्रिटिश थांबले नाही तर उर्वरित समाजाला गुन्हेगार जमात म्हणून बदनाम करत त्यांच्या साठी “गुन्हेगार जमाती” चा कायदा आणून समाजाला सन्मानाने जीवन जगण्या पासून वंचित ठेवले.क्रांतिवीर खाज्या नाईक यांचा अंत बेसावधपणे, घातपाताने झाला. शेवटपर्यंत लढण्याची ऊर्मी असणारा हा वीर थकला नाही की झुकला नाही. त्यांचा त्याग ,बलिदान ,शौर्य ,वीरता याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा ,स्वत्व जागृत करणार आहे. सत्ताधाऱ्यांनी व जमीनदारांनी त्यांना नेहमी चोर लुटारू म्हणून हिणवले असले तरी खऱ्या अर्थाने त्यांनी केलेली लढाई ही स्वातंत्र्यासाठीची होती ,अन्यायाच्या विरोधात होती. लढले स्वातंत्र्यासाठी बलिदान केले ते स्वातंत्र्यासाठी .खरंतर हा भिल्ल आदिवासींचा राष्ट्रीय उद्रेक होता. खानदेशातील या लढ्याची वैशिष्ट असे की त्याकाळी भिल्ल सोडून इतर साऱ्यांनी इंग्रजी सत्ता मान्य केली. मात्र भिल्लांनी कधीही मान्य केली नाही. म्हणून हा संघर्ष सामाजिक होता असे म्हटल्यास वावगे होणार नाही. भिल्लांच्या असंतोषाला जसे सत्ताधारी ब्रिटिश सरकार जबाबदार होते तसे ब्रिटिशांच्या बोटाला धरून, त्यांच्या संरक्षणात आदिवासींची अवहेलना करणारे त्यांना लुटणारे त्यांना गुलाम समजणारे जे भारत मातेची पुत्र होते तेसुद्धा यास जबाबदार होते. हा इतिहास आहे !गव्हर्नर एलफिस्टन म्हणतात की “सूर्य मावळत नाही एवढ्या जगाच्या पाठीवरच्या देशांवर राज्य करणाऱ्या आम्हा राज्यकर्त्यांना खानदेशातील भिल्लांनी सरंजामी झोप कधीही येऊ दिली नाही “यातच भिल्ल क्रांतिकारक खाज्या नाईक यांचा गौरव नाही का ? दुर्दैवाने खानदेशातील आदिवासींच्या स्वातंत्र्य लढण्यासाठी च्या विद्रोहाचा बलिदानाच्या इतिहासाला इतिहासकारांनी न्याय दिला नाही तो उपेक्षितच राहिला हे कटू सत्य नाकारता येणार नाही.
– डॉ.कांतीलाल टाटीया