क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप करू नका : हिंदु जनजागृतीसह विविध संघटनांची मागणी

मुंबई – हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करणार्‍या, सहस्रो हिंदु मंदिरे तोडणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव राज्य शासनाच्या वतीने मुंबईत उभारण्यात आलेल्या क्रीडासंकुलाला देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. हिंदु जनजागृती समिती या निर्णयाचा जाहीर निषेध करते. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मोगलांचे उदात्तीकरण करणारा हा निर्णय असून महाराष्ट्र शासनाने क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव क्रीडासंकुलाला देण्याचे पाप करू नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक निवेदन मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. या वेळी विक्रोळी येथील श्रीशिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, हिंदुराष्ट्र सेना महामुंबईचे साहिल जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार हे उपस्थित होते. धारावी येथील श्रीराम गणेश मित्रमंडळाचे श्री. कांतीलाल पटेल, हिंदुराष्ट्र सेना महामुंबईचे अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांच्या स्वाक्षरीचे हे संयुक्त निवेदन मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

याविषयी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत रायगड, विशाळगड, कुलाबा किल्ला आदी अनेक किल्ल्यांवर अनधिकृत थडगी, मजारी आदींच्या माध्यमातून इस्लामी अतिक्रमणे झाल्याचे उघड झाले आहे. त्यात आता शासनाच्या क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न होत आहे. आज टिपू सुलतानचे दिले, तर उद्या औरंगजेब, बाबर, खिलजी, गजनी, घौरी आदींच्या नावांनीही शासकीय प्रकल्प येतील. असे होऊ द्यायचे नसेल, तर आताच हे थांबवले पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात इस्लामी आक्रमकांच्या नावे कोणतीही स्मारके असता कामा नये, अशी समस्त हिंदू समाजाची आणि महाराष्ट्रवासियांची धारणा आहे, असे समितीने म्हटले आहे. ठाकरे सरकार एकीकडे ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ करण्याच्या तयारीत असतांना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख मात्र टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न करत आहेत, हा विरोधाभास आहे. तरी या प्रकरणाची मा. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन या क्रीडासंकुलाचे नाव बदलावे, अशी कळकळीची विनंती समितीने केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!