क्षयरोगी शोधण्यासाठी 161 पथके 64 हजार 272 घरांपर्यंत जाऊन करणार तपासणी 

नंदुरबार – दिनांक 15 नोव्हेंबर 2021 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आवाहन केले आहे की, पूर्ण उपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो तरी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी.
प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली असून सदर समितीची सभा दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी  जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे संपन्न झाली. सदर सभेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जनतेस आवाहन केले की, क्षयरोगाची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत आहेत, त्यांचा लाभ घ्यावा तसेच  गेल्या पाच वर्षात अधिक क्षयरुग्ण आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले व अभियान यशस्वी होणेसाठी मार्गदर्शन केले.
या अभियाना अंतर्गत जिल्हयातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्त्या व स्वयंसेवक यांच्याद्वारे  प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियाना अंतर्गत एकुण  3,21,359 इतक्या लोकसंख्येतील 64,272 घरांपर्यंत 161 पथके पोचणार असून घरोघरी भेट देऊन क्षयरोगाच्या लक्षणांची माहिती देणे व तसेच संशयित क्षयरुग्ण आढळल्यास त्यांची थुंकी नमुने घेऊन जवळच्या सुक्ष्मदर्शक केंद्रात तपासणी करीता देऊन आवश्यकतेनुसार एक्स रे तपासणी व सिबीनॅट मशिनव्दारे तपासणी करण्यांत येणार आहे. जिल्हयातील निवड केलेल्या अतिजोखमीच्या भागात ही मोहिम राबवुन रुग्ण शोधले जाणार आहेत. या मोहिमेत आढळलेल्या रुग्णांना त्वरीत उपचार देण्यात येणार आहे.
 सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. शिरीष भोजगुडे, डी.पी.एस राहुल वळवी, पी.पी.एम. समन्वयक समुवेल मावची, डिइओ रामचंद्र बारी आदी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!