खंडणीसाठी धमकवले; नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

नंदुरबार – साईराज सरकार ट्रॅव्हल्सच्या बसमधून बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक करतात म्हणून ट्रॅव्हल्स मालकाला धमकावले तसेच मारहाण करीत खंडणी मागितल्याचा आरोप नवापूर येथील एका नगरसेवकावर करण्यात आला आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात एक नगरसेवक व १० ते ११ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशपाक खान युसुफ खान (वय ३६) रा- कासोदा ता. एरंडोल जि. जळगाव या चालकाने नवापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १९/१२/२०२१ रोजी रात्री १ ते ३ वा सुमारास चालक अशपाक हा सुरत येथून जळगावकडे साईराज सरकार ट्रॅव्हल्स बस क्र.GJ ११ X ०६८८ घेऊन निघाला होता. त्यावेळी बस मध्ये २८ प्रवासी होते. नवापुर शहाराजवळ धडधडया रेल्वे गेट बंद असल्याने चालक अशपाकने ट्रॅव्हल्स थांबवली असता त्या ठिकाणी १० ते १२ अनोळखी लोक मोटरसायकलवर आले. त्यांनी मोटरसायकली बसच्या पुढे लावून अडवले आणि बस बेकायदेशीर चालु आहे, पुढे जावू देणार नाही, हप्ता लागेल; असे सांगून खंडणीची मागणी करू लागले.मग  चालकाने “ट्रॅव्हल्सचा मालक शाहरुक खाटीक, रा.नवापुर यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले. ट्रॅव्हल्स मालकाने तेथे येऊन विचारणा केली असता नगरसेवक असलेल्या व्यक्तीने तुझी ट्रॅव्हल्स बस बेकायदेशीर आहे, तुला येथून जावू देणार नाही, हप्ता द्यावाच लागेल; असे सांगून खंडणीची मागणी केली. गावाची गाडी आहे, कशाला त्रास देता; असे शाहरुख खाटीक सांगू लागताच नगरसेवकाने शाहरुकच्या पोटावर चाकु लावला व एका अनोळखी इसमाने शाहरुकच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घेतले. तसेच दुसऱ्या एकाने शाहरुकसोबतच्या मित्राला लोखंडी पाईप मारण्याचा प्रयत्न केला. तर अन्य व्यक्तींनी लोखंडी सळईने बसच्या काचा फोडत हाताबुक्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!