नंदुरबार – वाहनधारकांच्या आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्यामुळे प्रचंड दुरावस्था झालेल्या शहादा – शिरपूर रस्त्याच्या आणि शहादा-दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अखेरीस आज शेतकरी संघर्ष समिती, विविध गावातील ग्रामस्थ , सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या संतप्त जमावाने थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन आज दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता घेराव घातला. त्याचबरोबर लोकस संसद भरवून अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला.
दोन वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्यांच्या दूर्दशेकडे संबंधित जबाबदार अधिकारी यांनी कमालीचे दुर्लक्ष चालवले आहे. परिणामी दैनंदिन कामकाज आणि अन्य प्रवासा निमित्त त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना जीव गहाण टाकल्या प्रमाणे ये जा करावी लागत आहे. सोशल मीडियावर याविषयी प्रचंड संतप्त भाषेतील प्रतिक्रियांचा रोज पाऊस पडत असतो. आमदार-खासदार पासून आजी-माजी मुख्यमंत्र्यांपर्यंत व्यथा मांडून झाल्यावर देखील कोणीही मात्र दखल घेतलेली नाही. सहनशीलतेचा अंत पाहणारा हा मुद्दा अखेर आज पेटला. घेराव घालून सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी जरी जाब विचारला. तथापि खरोखर दुरुस्ती कामाचे अधिकार हाती असलेला जबाबदार अधिकारी आश्वासन द्यायला समोर नसल्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही. जर रस्ते लवकर दुरुस्त झाले नाही, तर यापुढे रास्तारोको सारखे उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, संताप व्यक्त करताना उपस्थितांनी सांगितले की वाहनधारक तसेच शेतकऱ्यांच्या जीवावर हा रस्ता उठला असतांना संबंधित विभाग सतत दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करायला आता वाहतूकदारही धजावत नसल्याने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे. सतत होणाऱ्या अपघातांनाही हे अधिकारीच जबाबदार आहेत, असे म्हणणे मांडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धुळे येथील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यावर व दीर्घ चर्चेनंतर प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासनाने ह्या आंदोलनाची दखल घेत येत्या १५ दिवसात ह्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासोबत, सदर रस्त्यांच्या सर्व ठेकेदारांची ७ दिवसाच्या आत बैठक लावून सदर प्रश्न कायमचा मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा शेतकरी संघर्ष समितीचे अभिजित पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया, प्रकाशाचे हरीभाई पाटील, मंदाणाचे अनिल भामरे, आर.आर.बोरसे, माजी सभापती भगवान पाटील, बाबा पाटील, वाहन चालक मालक संघटना, विनोद बाफना, नाना निकुंभ, यशवंत चौधरी, संतोष वाल्हे, अनिल भामरे, संजय पाटील, अनिल कुवर, तुषार गोसावी आदींसह शेतकरी बांधव विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर प्रशासनातर्फे प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.जे.वळवी, शाखा अभियंता एस.वाय. पगारे, राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र बोरसे आदी उपस्थित होते. आंदोलना प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, सारंगखेडा
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.