नंदुरबार – चोरी किंवा अत्याचार झालेल्या संकटग्रस्त व्यक्तीला पोलीस ठाण्यात कसे खेटे घालावे लागतात याचे अनेक किस्से जाहीर होत असतात व सिस्टिमचा भलता चेहेरा समोर येत असतो. परंतु पोलीस दलातील अधिकारी माणुसकीचा ओलावा देखील जपून असतात; याची प्रचिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली. सरकारी मदतीची रक्कम हातातून चोरीस गेली म्हणून ढसाढसा रडणाऱ्या निराधार वृद्धाच्या व्हायरल झालेल्या बातम्या पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी मानवधर्माला जागत तातडीने त्या वृद्धाला पोलीस दलाकडून रक्कम देत मोठा दिलासा दिला.
ही घटना अशी की, पदम हारचंद कोळी वय वर्षे ७५ वर्षे रा.डामरखेडा ता.शहादा हे संजय गांधी निराधार योजनेच्या मदतीवर अवलंबून असलेले वृद्ध गृहस्थ. त्यातच पत्नीस कोरोना झाला. तिच्या उपचाराच्या खर्चामुळे हवालदील झालेला प्रपंच. या साऱ्यामुळे संसाराचा गाडा मोडकळीस आलेला. पत्नी कोरोनातून बाहेर आलीच नाही व गतवर्षी ती साथ सोडून निघून गेली. वृद्धापकाळात त्याचे जगणे आणखीच हलाखीचे आणि दर्दभरे झाले. पत्नीचे कोरोनामुळे निधन झाल्याने शासकीय योजनेतून ५० हजार रु. मंजूर झाल्याचे समजले आणि आयुष्याच्या संध्याकाळी सरकारी मदतीच्या रुपाने आशेचा किरण गवसल्याचा या वृद्धाला भास झाला. काल धावतच तो प्रकाशा येथील स्टेट बॅंकेत गेला. ते ५० हजार त्याने बॅंकेतून काढून घेतले. पैशाची पिशवी पत्नीच्या आठवणीने ओलावलेल्या डोळ्यांना लावली. घरी परततांना पत्नीच्या आठवणीने गळ्याशी दाटलेला आंवंढा गिळण्यासाठी पाणी पिण्यासाठी एका हॅाटेलवजा टपरीवर थांबला. सरकारी दिलासा मिळाल्याने तो थोडा रिलॅक्स झाला होता. तेवढ्यात चोरट्याने डाव साधला. क्षणात पैशाची पिशवी गायब झाली. आयुष्यात पहिल्यांदा इतके पैसे एकदम पाहिलेले..पण तेही काही क्षणाचेच सोबती ठरले. मघाशी अर्धवट गिळलेला हुंदका आता गळ्यातून बाहेर पडला. ढसाढसा रडला. आयुष्यातल्या अखेरच्या दिवसात दारिद्र्यासोबत वाट्याला आलेली हतबलता मात्र तशीच गिळून तो नशीबाला दोष देत मार्गस्थ झाला.
आज वृत्तपत्रात बातमी वाचून नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला आपलेसमोर समक्ष हजर करण्याचे शहादा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना फर्मान सोडले. शहादा पो.स्टे.च्या पोलीस गाडीतून त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले गेले.कालच्या धक्क्यातून अद्याप तो सावरेलेला नव्हताच. पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली होती. आता थेट एस.पी.नीच का बोलावले असावे म्हणून तो आणखीच घाबरेलेला होता. तेथे गेल्यावर त्याला आणखी मोठा बसला परंतु हा गोड धक्का होता. पोलीस अधीक्षकांनी ५० हजार रु. त्याच्या हातात ठेवले. ”तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच परंतु माझ्या सहकारी पोलिसांनी तुमच्यासाठी वर्गणी काढून पैसे जमवले आहेत त्याचा स्वीकार करा” म्हणून खुद्द अधीक्षकांनी विनंती केली. पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून जमा केलेले पैसे स्विकारताना त्याला रडू कोसळले. एका वृद्धाचे लुटलेले समाधान वर्गणी काढून परत करताना उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनाही गहिवरून आले.
नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधिक्षक विजय पवार,शहाद्याचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, वाचक अर्जुन पटले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या वृद्धास ही मोलाची आणि माणुसकीची मदत करुन पोलीसातील माणुसकीचा परिचय करुन दिला. “आता चार दिवस जास्त जगेन” असे म्हणत तो ७५ वर्षांचा वृद्ध शहादा पो.स्टे.च्या गाडीत स्वतःहून जाऊन बसला. मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता ! नंदुरबार पोलीसही साश्रू नयनांनी त्याच्या आनंदात सहभागी झाले होते !!
खाकीतील माणुसकीच्या राजा (मा.पी.आर.पाटील) आणि त्यांच्या खाकी राज्यातील समस्त रयतेला(पोलिस बंधु-भगिनी) मानाचा मुजरा !💐🙏⭐⭐⭐⭐⭐
© प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद
शेवटी पोलिस सुद्धा माणूस आहे, त्यालाही प्रेमभाव आहेच….म्हणून समाजाने पूर्वग्रहदूषित राहू नये…खाकी वर्दीतल्या मानवतेला, दातृत्व वृत्तीला वंदन.. मा पो अधीक्षक पाटील साहेब आपल्या सहृदय भावनेला नतमस्तक… समस्त पोलीस दलाचे अभिनंदन
Great News…
Proud of Respected S P Saheb & Their team for Nice work….. 🌹👍👍🙏