नंदुरबार – गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ बनून सर्व सामान्य समाजघटकांच्या सुरक्षेसाठी कठोरपणे कायदा-सुव्यवस्था हाताळणारे आणि खाकी वर्दीत सदैव कठाेर बनून वावरणारे अधिकारी-कर्मचारी माणुसकीचा ओलावा देखील जपत असतात, याचा अनुभव नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने आज दिला. याचा संदर्भ असा की, शहरातील वाघेश्वरी टेकडी भिलाटी परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलीला चोवीस तासाच्या आत पोलीसांनी शोधून काढलेच. शिवाय मुलगी अनाथ असल्याने तिचा इथून पुढील शिक्षणाचा भार स्विकारत जिल्हा पोलीस दलाने तिला प्रमुख शैक्षणिक प्रवाहात आणण्याची देखील स्विकारली. नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी ही माहिती दिली.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी नंदुरबार शहरातील वाघेश्वरी टेकडी भिलाटी परीसरात राहणारी अल्पवयीन मुलगी संगिता राज वळवी (वय-१०) ही दुपारी ३ वाजेच्या सुमारास परीसरातील दुकानावर दुधाची पिशवी घेण्यास गेली. मात्र, घरी परत आली नाही. म्हणून कालीबाई रोहीदास पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या अपहरणाचा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ईसमाविरोधात दि.२० सप्टेंबर २०२१ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तपास अधिकारी सपोनि नंदा पाटील यांना मार्गदर्शन केले. पथकाच्या माध्यमातून २४ तासाच्या आत अपहृत मुलीचा शोधही लावला. मुलीला सुखरूप पालकांच्या हाती देण्यात आले तथापि ती मुलगी अनाथ आहे व ती चुलत बहिणीकडे राहते. तसेच परिस्थिती हलाखीची आहे; असे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांना निदर्शनास आले. त्यांनी त्या मुलीची विदारक परिस्थिती नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना कथन केली. त्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलीचा दहावी, बारावीपर्यंत किंवा त्यापुढेही शिकल्यास तो संपूर्ण शैक्षणिक खर्च पोलीस दलाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितले की, त्या मुलीचे शिक्षण होत नसल्याचे आम्हाला माहित झाले. म्हणून तिला शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा आम्ही निर्णय केला आणि इथून पुढे त्याला सर्व मदत देण्यात येणार आहे.