नंदुरबार – खास शेतकर्यांचे प्रबोधन करण्यासाठी ओढ ज्ञानाची जोड संस्कृतीची, हे ब्रिद घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील पहिले रेडिओ कम्युनिकेशन सेंटर (रेडिओ विकास भारती, एफएम ९०.८ केंद्र) येथील कृषी विज्ञान केंद्राने स्थापन केले असून रविवार दि.२४ ऑकटोबर पासून त्याच्या अधिकृत प्रसारणाला सुरुवात करण्यात येत आहे. या रेडिओ विकास भारती विकास केंद्राचा उदघाटन सोहळा आज रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
हे रेडिओ सेन्टर डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्रांतर्गत सुरु करण्यात आले असून नंदुरबार जिल्ह्यातील हे पहिले व खानदेशातील तिसरे कम्युनिकेशन रेडिओ सेन्टर आहे. यामुळे शेताच्या बांधावर बसूनही शेतकर्यांना पीक मार्गदर्शन मिळू शकणार आहे. स्थानिक लोकांना स्थानिक भाषेतून माहिती पोहचवणे, या उद्देशाने कम्युनिकेशन रेडिओ सेन्टरची संकल्पना केंद्र सरकार राबवत आहे. समाजोपयोगी सकारात्मक माहिती प्रसारीत करायला तसेच जनतेचे प्रबोधन करायला ना नफा ना तोटा तत्वावर काम करणार्या सेवाभावी संस्थांना सोपे व्हावे, यासाठी अशा संस्थांना हे कम्युनिकेशन रेडिओ सेन्टर सुरु करण्याची परवानगी दिली जाते. पहिले कम्युनिकेशन रेडिओ सेंटर २००० साली बारामती येथे सुरु झाले. लोकांचा वाढता सहभाग बघून केंद्रसरकारने गती वाढवली आणि शैक्षणिक, कृषी व तत्सम क्षेत्रासाठी कार्य करणार्या अधिक संस्थांना रेडिओ स्टेशन चालवण्याची संमती दिली. आता सध्या महाराष्ट्रात २३ रेडिओ स्टेशन चालू आहेत. जिल्हा आकाशवाणी केंद्राप्रमाणे याचे जिल्हाभरात प्रक्षेपण होऊ शकत नाही. कारण याच्या ध्वनीलहरींची मर्यादा १५ ते २० किमी ईतकीच असते.
दरम्यान माहिती देतांना या रेडिओ केंद्राचे प्रमुख राहूल ठाकरे यांनी सांगितले की, कृषी विज्ञान केंद्राची माहिती, उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्या सोबतच स्थानिक कलाकार, क्रिडापटू, महिला कार्यकर्त्या, प्रगतशील शेतकरी यांच्या मुलाखती या रेडिओ केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. हवामानाचा अंदाज देणारा कृषी केंद्राचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून दर पाच दिवसांचे तापमान, पाऊस,थंडी विषयीचे हवामान अंदाज सांगणारे तसेच पीकांविषयी मार्गदर्शन करणारे प्रसारणही केंद्रावरून केले जाईल. आठवड्यातून दोन वेळा मंगळवार व शुक्रवार रोजी हे प्रसारण केले जाईल. सध्या रोज दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी ७ ते ९, दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कार्यक्रम प्रसारित केले जाणार असून कालांतराने २४ तास सेवा देण्याचा विचार आहे. लवकरच ऍप स्वरुपात देखील हे रेडिओ केंद्र लोकांना ऐकता येईल आणि त्यामुळे रेडिओ रेंजच्या बाहेरील म्हणजे पर राज्याच्या हद्दीत राहून देखील येथील कार्यक्रम लोकांना ऐकता येतील, असेही रेडिओ केंद्र प्रमुख राहूल ठाकरे म्हणाले. तर कार्यक्रम अधिकारी केतकी जानवे यांनी अहिराणी, आदिवासी आणि मराठी भाषांमधून प्रबोधन, लोककलेतून मनोरंजन करणारे कार्यक्रम, मुलाखती प्रसारणाचे नियोजन केले असल्याची माहिती दिली.
कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे अधिक माहिती देतांना म्हणाले की, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार द्वारा संचलित, विकास भारती कम्युनिटी रेडिओ केंद्रास सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांची मान्यता मिळाली आहे. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषि, आरोग्य, पर्यावरण, कला- क्रिडा, साहित्य, लोककला इ. राष्ट्रीय संस्कारात्मक विषयांसाठी रेडिओ विकास भारती हे प्रभावी आणि हक्काचे व्यासपीठ असेल. कृषि तज्ञांचे मार्गदर्शन, हवामान अंदाज, प्रयोगशील शेतकर्यांचे अनुभव रेडिओद्वारा शेतकरी बांधवांना घरी बसून वा शेताच्या बांधावर प्राप्त होणार असून ही प्रभावी कृषि चळवळ ठरेल.
रविवार दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता कोळदा येथे डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते व खासदार डॉ.हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटनसोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेष अतिथी म्हणून भा.कृ.अ.प. अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक प्रमोद पाटील हे उपस्थित राहणार आहेत. डॉ.हेडगेवार सेवा समितीचे कार्यकारिणी मंडळ सभासद डॉ.नितीन पंचभाई व कृषी केंद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.