नंदुरबार – घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी केलेल्या आजच्या नंदुरबार दौऱ्या दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर हिना गावित याच उमेदवार राहतील; असा स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ वर्तुळात खासदार डॉ हिना गावितांना पर्याय देण्याचा विचार होत असल्याच्या चर्चेला काही अंशी विराम मिळाला.
घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद अशा विविध कार्यक्रमा सोबतच भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडली. यानिमित्त काढण्यात आलेली भव्य मिरवणूक, भाजपाचे ध्वज आणि पताका लावून सजवण्यात आलेले प्रमुख मार्ग तसेच जागोजागी झळकलेले बॅनर्स यामुळे संपूर्ण नंदुरबार शहर भाजपामय बनलेले दिसले. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक किलोमीटर पायी चालून रहिवासी आणि व्यावसायिक यांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताला जगातील सर्वाधिक विकसित देश बनविण्यासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार राजेश पाडवी, भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित, संघाचे जेष्ठ प्रसारक राजेश गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तालुका अध्यक्ष जे एन पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तथापि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे नंदुरबार जिल्हा भाजपात चालू असलेली अंतर्गत गटबाजी संपणार का? याकडे भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. प्रत्यक्ष कार्यक्रमाचे ठिकाणी मात्र सर्व प्रमुख पदाधिकारी आपापल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले. सुपर वॉरियर संवाद कार्यक्रमात तसेच संपर्क से समर्थन यात्रेच्या समाप्तीनंतर झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी, संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी प्रगती करतानाच भारत आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या कार्याची महती सांगितली आणि प्रत्येक कार्यकर्त्याने संपर्क अभियान राबवण्यासाठी रोज तीन तास द्यावे असे आवाहन केले. त्याचवेळी ” मे 2024 च्या अखेरीस नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यादेखील आपल्याला खासदार म्हणून निवडून आलेल्या दिसतील. खासदार डॉक्टर हिना गावित यांचे कार्य पहिल्या क्रमांकाचे असून आदिवासी बांधवांपर्यंत त्यांनी कार्य पोहोचवले आहे” असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गावित परिवाराच्या विरोधात जनमत बनले असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे गेला असून खासदार डॉक्टर हिना गावित यांना पर्याय शोधला जात असल्याची चर्चा त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने पसरविण्यात येत असते त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्येक बैठकीत आणि भाषणात दिलेले संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत. महामंत्री विजय चौधरी यांनी देखील दोन दिवसापूर्वीच खासदार डॉक्टर हिना गावित यांची उमेदवारी थोपविण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची चर्चा निरर्थक असून त्यांनी केलेले विकास काम पाहता पर्यायी उमेदवाराचा प्रश्न उद्भवत नाही; असा खुलासा केला होता.