नवी दिल्ली – गाय आणि गाईचे शेण व गोमूत्र हा अनेक विद्वानांच्या थट्टेचा विषय बनला आहे. परंतु ऊर्जानिर्मिती सह विविध स्तरावर यांची मोठी उपयोगिता असल्याचेसुध्दा अनेक संशोधकांनी वैज्ञानिक निकषांवर सिद्ध केले आहे. आता टाकाऊ समजल्या जाणाऱ्या व गवऱ्यांपर्यंत मर्यादित मानल्या गेलेल्या गायीच्या शेणापासून पेंट बनवण्यात यशस्वी झालेल्या कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून खेड्यापाड्यात प्रशिक्षण देऊन हा पेंट उद्योग विकसीत करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील खादी आणि ग्रामोद्योग आयोगा (KVIC) च्या जयपूर येथील कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट (KNHPI) यांनी गायीच्या शेणापासून खादी प्राकृतिक (नैसर्गिक) पेंट विकसित केले आहे. खादी प्राकृतीक पेंट हे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर आहे. KNHPI ने विकसित केलेल्या खादी प्राकृत पेंटची चाचणी नॅशनल टेस्ट हाऊस, गाझियाबाद (भारत सरकार), नॅशनल टेस्ट हाऊस, मुंबई (भारत सरकार) आणि श्री राम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च, दिल्ली (ISO प्रमाणित चाचणी प्रयोगशाळा) येथे करण्यात आली आहे. विशेष असे की, पेंटसाठी आवश्यक असलेले सर्व पॅरामीटर्स याने पूर्ण केलेत.
खादी प्राकृत पेंटच्या निर्मितीला चालना मिळाल्यास स्थानिक उत्पादनाला चालना मिळू शकेल. शाश्वत रोजगार निर्माण होईल शिवाय शेतकरी आणि गाय निवारागृहांसाठी अतिरिक्त महसूल निर्माण होईल. ग्रामीण भागात रोजगारही निर्माण होईल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल आणि स्थलांतर नियंत्रित करण्यात मदत होईल; असा विश्वास मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सहज उपलब्ध होणारे गाईचे शेण हा प्राकृतीक पेंटच्या निर्मितीमध्ये वापरला जाणारा प्रमुख घटक आहे. 100 किलो. 500 लिटर रंग तयार करण्यासाठी शेणाचा वापर केला जातो. म्हणून, पेंट युनिट्सची स्थापना शेणाच्या वापरासाठी उपयुक्त ठरेल आणि त्याद्वारे पर्यावरण स्वच्छ होण्यास मदत होईल. खादी प्राकृत पेंट निर्मितीचे तंत्रज्ञान देशातील खेड्यापाड्यातील अनेक युनिट्सना प्रदान करण्यात आले असून कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट देशातील ग्रामीण व शहरी भागात याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देत आहे.
प्राइम अंतर्गत प्राकृतीक पेंट उत्पादन युनिट स्थापन केले जात आहेत व त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री नारायण राणे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.