नंदुरबार – गाव विकासाच्या आणि वैयक्तिक व समूह विकासाच्या विविध योजना राबवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागील दहा वर्षात खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेला विकास निश्चितच नंदुरबार जिल्ह्याचा कायापालट करणारा आहे. त्या बळावर आपण ही निवडणूक जिंकणारच. तरीही प्रत्येक पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख पासून गाव पातळीवरच्या आणि तालुका पातळीवरच्या समितीप्रमुखांपर्यंत प्रत्येकाने परिश्रम घेणे अगत्याचे आहे; असे नमूद करून यंदाच्या निवडणुकीत खासदार डॉक्टर हिना गावित यांना चार लाखाहून अधिक मताधिक्याने जिंकवणार; असा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व समिती प्रमुखांसह नेत्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूक पदाधिकारी नियोजन बैठक नुकतीच नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. त्या सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्र क्लस्टर प्रमुख तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, खासदार डॉक्टर हिनाताई गावित, आमदार काशीराम पावरा, काँग्रेस मधून भाजपात आलेले माजी मंत्री पद्माकर वळवी, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा चे लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी व धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, प्रदेश समिती सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, नागेश पाडवी आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यांमधील सर्व समिती प्रमुख, यांच्यासह तालुका पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक समाज घटकाला आपल्या विकास कार्यात सामावून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने उदार भूमिका स्वीकारली असल्यामुळे जो कोणी आपल्या पक्षात येत असेल त्याला सोबत घेऊन चालण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागेल असे गिरीश महाजन यांनी याप्रसंगी स्पष्ट करतानाच लोकविकासाच्या कार्यावर जनता शिक्कामोर्तब करेल आणि खासदार डॉक्टर हिना गावित विजय होतील तथापि आपल्याला चार लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी परिश्रम करायचे आहे अशा शब्दात गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्येक समाज घटकाला न्याय देणारा विकास मोदी सरकार आणि राज्य सरकार करीत असल्यामुळे मागील दहा वर्षात कधी झाली नव्हती इतकी विकास कामे आपल्या जिल्ह्यात झाली परंतु विरोधकांकडे मुद्दा शिल्लक नसल्याने आणि जनता पाठीशी नसल्यामुळे संविधान बचाव सारख्या पोकळ गोष्टी चा आधार घेत आहेत. समान नागरी कायदा आणि तत्सम कायदे राबवताना कधीही आदिवासी दलित यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यापूर्वी अनेकदा स्पष्ट सांगितले आहे असे असताना आमचे विरोधक दिशाभूल करतात; अशा शब्दात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या प्रसंगी विरोधकांवर घणाघात केला.
मागील पन्नास वर्षांपासून या मतदारसंघात अशी अनेक गावे आहेत की जिथे कोणी लोकप्रतिनिधी पोहोचला नाही रस्ते वीज पाणी सारख्या मूलभूत गोष्टी कोणी दिल्या नाही त्या सर्व ठिकाणी पोहोचून आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गाव विकास केला, असे भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी भाषणातून नमूद केले तसेच वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना राबवून केलेल्या विकास कार्याची सविस्तर माहिती दिली. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी लोकविकासाची राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचे स्पष्ट करीत पक्षीय कार्य प्रामाणिकपणे करेन असे भाषणातून सांगितले. कोणत्या पदाधिकाऱ्याने कोणती जबाबदारी कशी पार पाडायची आहे यासह पक्षीय धोरण समजावून देणारे मार्गदर्शन या प्रसंगी विजय भाऊ चौधरी यांनी केले.