नंदुरबार – समस्त हिंदु धर्मियांचे प्रथम पुजनीय वंदनीय अराध्य दैवत श्री गणपती मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याला, सामुहिक आरती-पुजनाला, मिरवणुकीला मात्र बंदी घातली जात आहे. हिंदु बांधवांच्या धार्मिक श्रध्दा भावनांवर अशारितीने आघात करायला महाराष्ट्रात काय तालिबानी राजवट चालली आहे काय? असा संतप्त प्रश्न भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला आहे. हे आदेश तातडीने हटवावेत अशी मागणी करीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी या मागणीचे निवेदन आज १७ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले.
त्या निवेदनात विजय चौधरी यांनी म्हटले आहे की, श्रध्दांवर आघात करणारे आदेश लागू करून अप्रत्यक्षपणे धर्मभेदाचे राजकारण केले जात आहे. नंदुरबार मानाच्या गणपतींची दीडशे वर्षांची परंपरा खंडित केली गेली, कार्यकर्ते मोजक्या संख्येने सॅनिटाईजेशन व अंतर राखण्याचे नियम पाळायला तयार असतांनाही तापीकाठावर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला, शहाद्यात गणेश मंडळांचे वाजंत्री साहित्य जप्त करीत अन्याय केला गेला, हे सर्व पाहता तालीबानी राज्य चालू आहे का ? असा प्रश्न पडतो. नंदुरबारला देवाच्या कृपेने वाहत्या पाण्याचे भले मोठे पात्र तापी नदीच्या रुपाने लाभलेले आहे. असे असतांना मोठ्या मंडळांच्याही मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करायला लावणे, सामुहिक आरती पुजनाला बंदी घालणे, हे सर्व दळभद्रीपणाचे लक्षण असून हिंदु धर्मियांना जाणीवपूर्वक लक्ष बनवणारे आहे. याचा धिक्कार करतो आणि ताबडबतोब हे आदेश मागे घेतले जावेत, अशी मागणी करतो, असे विजय चौधरी यांनी म्हटले आहे.