स्थानिक प्रशासन मूर्तीदान किंवा कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह करतात. त्याला बळी पडू नका आणि धर्मशास्त्रविसंगत कृती करून श्रीगणेशाचा होणारा अवमान टाळा. आपण दहा दिवस गणेश मूर्तीचे भावपूर्ण पूजन करतो, त्यामुळे त्यात श्री गणेशतत्व आकृष्ट होते. वाहत्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे श्री गणेशतत्व पाण्यामध्ये मिसळते. त्याचप्रमाणे पाण्याचे बाष्पीभवन होऊन श्री गणेशतत्व वातावरणात सुद्धा मिसळते आणि संपूर्ण सृष्टीतील सूक्ष्म, अतिसूक्ष्म जीव, जंतू, पशु, पक्षी, प्राणी आदींना त्याचा लाभ होतो. याउलट मूर्तीदान केल्यावर त्या जमा केल्या जातात आणि पुन्हा रंगरंगोटी करून स्वःफायद्यासाठी पुन्हा विकल्या जाऊ शकतात आणि इतरांची पुढच्या वर्षी फसवणूक होऊ शकते. मूर्तीदान केलेल्या मूर्ती एका हौदात जमा करून त्यानंतर त्या कचऱ्याच्या गाडीत वाहून नेऊन खाणीमध्ये टाकल्या जातात. हौदातून मूर्ती बाहेर काढतांना संबंधित व्यक्ती हौदात उतरतो. त्याचे पाय गणेशमूर्तींवर पडतात आणि अशाप्रकारे श्री गणेशाचा अपमान होतो, त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असतो. बऱ्याच वेळा या हौदातील मूर्ती नदीमध्ये विसर्जन केल्या जातात, असे पण आढळून आले आहेत. तर मग गणेश भक्तांनो आपणच आपल्या घरची गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात का विसर्जन करू नये ? तेव्हा कुठल्याही प्रलोभनांना आणि बळजबरीला बळी न पडता शास्त्रोक्त पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करूया ही सर्वांना विनंती आहे.
– डॉ भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ