नंदुरबार – गांजाची शेती हा विषय आता सामान्य बनू पहात असून दर दोन तीन आठवड्यानंतर एक तरी प्रकरण उघडकीस येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने शहादा तालुक्यात घोटाळे गावी केलेल्या अशाच एका कारवाईत 8 लाखाहून अधिक रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यात घोटाळी येथे एका इसमाने त्याचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी येथील पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करून कारवाईसाठी पाठवले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार व त्यांचे अमंलदार हे घोटाळी गाव शिवारातील तलावाजवळील कापसाच्या शेतांकडे पायी गेले. तेव्हा तेथून एका संशयिताने पळ काढला त्याचा पाठलाग केला असता तो जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला. त्या इसमाच्या कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी हिरवट रंगाच्या गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपूर्ण शेती पिंजून काढली असता तेथे 118 किलो 67 ग्रॅम वजनाचे 8 लाख 30 हजार 690 रुपये किंमतीची एकूण 83 गांजाची झाडे मिळून आले. संशयीत फाडया भंगी पावरा रा. घोटाळी ता.शहादा याच्या शेतात मिळून आलेली गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुध्द् गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये शहादा •पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे, शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, प्रमोद सोनवणे, सजन वाघ, विनोद जाधव, मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, विशाल नागरे, राकेश वसावे पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, दिनेश लाडकर, संजय रामोळे, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, यशोदिप ओगले, चालक संजय बोरसे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिपक परदेशी, पोलीस अमंलदार भरत ओगले दिनकर चव्हाण यांचे पथकाने केली.