नंदुरबार – शहादा पोलिसांनी आज सकाळी अचानक कारवाई करून मध्यप्रदेश हद्दीतून शिरपूरकडे गांजा वाहून नेणारी एक बोलेरो पकडली. याप्रकरणी 3 जणांना अटक करून बोलेरोसह सात लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मध्यप्रदेश हद्दीतून शहादा तालुक्यात गांजा सारख्या अमली पदार्थांची अवैध वाहतूक केली जाते अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना कारवाई करण्याचे सूचित केले. निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती घेतली व पाळत ठेऊन आज कारवाई केली. याविषयी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी 9.35 वा. शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर, साखर कारखाना रोडवर बोलेरो चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 39-जे-6540 संशयास्पद आढळली. म्हणून तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा 45 हजार 731रुपये किमतीचा 6 किलो 533 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाच्या पानबीया व काड्यांचा चुरा अंबुस वास असलेला प्रति किलो 7000/- रु चा अमली पदार्थ सुका गांजा आढळून आला. अंमली पदार्थ सुका गांज्याची वाहतुक करतांना मिळून आले म्हणून गाडीतील संशयितांना लगेचच अटक करीत 7 लाख रुपये किमतीची पांढ-या रंगाची बोलेरो जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिस नायक मणिलाल दिलीप पाडवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून राजेश सपन विश्वास (भिल) वय 25 रा. नांदीयाबड ता. पानसेमल जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश, वर्जन नारायण पावरा वय 25 वर्षे रा. गदडदेव ता. शिरपुर जि. धुळे, राजेश भटुसिंग पावरा वय 24 वर्षे रा. नांदियावड ता. पानसेमल जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश यांच्याविरोधात शहादा पो.स्टे गु.र.नं 141/2022.गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे प्रदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम 20,22 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयांचा पुढील तपास पोलिस निरिक्षक दिपक के बुधवंत करित आहेत.