नंदुरबार – नंदुरबार स्थानकात प्रवेश करण्या आधीच गांधीधाम पुरी एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडण्यामागे नेमके कारण काय आहे? याची चौकशी करण्यासाठी तसेच घटनेची पाहणी करण्यासाठी मुंबई सेंट्रल रेल्वेचे प्रबंधक जी व्ही एल सत्यप्रकाश हे स्वतः नंदुरबार येथे येत आहेत.
जबाबदार अधिकारी नेमला जाऊन ही चौकशी पुढे केली जाईल व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित केली जाईल असे संबंधित सूत्रांनी सांगितले आहे. पँट्री कार म्हणजे वातानुकुलीत रसोई यान. या बंदिस्त डब्यात स्वयंपाकाचे काम चालते. त्यामुळे येथे शॉर्टसर्किटमुळे, इलेक्ट्रिक शेगडीमुळे, सिलेंडरमुळे की आणखी कशामुळे आग लागली ? याचे अधिकृत उत्तर या चौकशीनंतरच मिळू शकणार आहे.
तथापि गांधीधाम एक्सप्रेस च्या पँट्री कारला आग लागण्याची आज घडलेली घटना नंदुरबार स्थानकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची जणू कठोर परीक्षा ठरली. आपत्काळात नंदुरबार रेल्वे स्थानकातील स्टाफ किती तत्पर राहू शकतो याचे प्रदर्शन आजच्या दुर्घटने प्रसंगी घडले. कारण आग लागल्याचे लक्षात येताच अवघ्या दहा मिनिटात आग लागलेला डबा वेगळा करून सर्व प्रवासी सुखरूप स्थानकात नेण्याचे काम करण्यात आले. ट्रेनमध्ये एकूण 22 डबे होते आणि ही पॅन्ट्री कार 13 व्या क्रमांकावर होती. यामुळे दोन्ही बाजूच्या प्रवासी डब्यांना पॅन्ट्री कारमधील आगीचा धोका होता. हे लक्षात घेऊन कोच मेंटेनर एस.आर.पाटील यांनी आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम दोन्ही बाजूचे डबे तोडून दुसऱ्या रुळावरून रेल्वेस्थानकात सुखरूप आणले. त्यामुळे एकाही प्रवाशाला इजा झाली नाही. दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी सर्व प्रवाशांना घेऊन सुखरूप पणे गांधी एक्सप्रेस पुढे रवाना होऊ शकली.
स्थानकातील वरिष्ठ अधिकार्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी ज्या त्वरेने पुढील व्यवस्था केली त्यातील तत्परता वाखाणण्याजोगी आहे. पॅन्ट्री कारमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच चेन ओढून पँट्रीमधील व्यवस्थापकाने एक्सप्रेस थांबवली होती. स्थानकापासून हे ठिकाण जवळपास एक किलोमीटर अंतरावर होते. आरपीएफ निरीक्षक बिरेन्द्र पांडे, जीआरपी निरीक्षक रमेश वावरे, स्थानक वाणिज्य अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी त्याप्रसंगी स्थानकात जागोजागी लावलेले अग्निरोधक सयंत्र हाती घऊन कर्मचाऱ्यांसह तत्काळ तिथपर्यंत धाव घेतली. डब्याच्या काचा फोडून आत मध्ये अग्निरोधक टाकण्यात आले. तथापि आग भडकत गेली. म्हणून अग्निशमन दलाला पाचारण केले. अभियंता अमित साहू यांनी कर्मचार्च्या मदतीने हाय टेन्शन वायर कट करीत बचावकार्य अधिक सुरक्षित केले.
दरम्यान, स्थानक वाणिज्य अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी रेल्वे सल्लागार समिती मधील मान्यवरांच्या मदतीने स्थानकात आणलेल्या प्रवाशांसाठी चहा नाश्ता जेवणाची पाकिटे देण्याची व्यवस्था करीत सर्व प्रवाशांना दिलासा दिला. रेल्वे सल्लागार समिती वरील मोहन खानवाणी, सुभाष पानपाटील, जवाहर जैन यांनी विशेष धावपळ केली. आमदार डॉक्टर विजय कुमार गावित, माजी आमदार शिरिषदादा चौधरी आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट दिली. तर प्रकृतीच्या कारणाने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दूरध्वनीवरून माहिती घेत नगरपालिका अग्निशमन दलाला सूचना दिल्या.
दरम्यान, ही आगीची घटना कशी घडली, याविषयी रेल्वे विभागाने दिलेल्या एका माहितीत म्हटले आहे की, सुमारे 10.35 वा. ट्रेन नंदुरबार स्थानकात प्रवेश करत असताना 12993 गांधीधाम पुरी एक्स्प्रेसच्या पँट्री कारला आग लागल्याची घटना घडली. डीवायएसएस यांनी हे शोधून काढले आणि नंदुरबार कंट्रोलला कळवले. आग विझवण्यासाठी स्टेशन आणि ट्रेनमध्ये उपलब्ध अग्निशामक यंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच अग्निशमन दलाला माहिती देऊन तात्काळ पाचारण करण्यात आले. ते 11 वाजता साइटवर आले.
10.45 वाजता पँट्री कार ट्रेनच्या पुढील आणि मागील भागापासून वेगळी झाली. वैद्यकीय पथक आणि इतर पॅरामेडिकल कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. कोणतीही दुखापत झालेली नाही.