नंदुरबार – गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगतांना आढळला म्हणून पोलिसांनी एका अल्पवयीन संशयीताला अटक करून गुन्हा नोंदवला आहे. 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी अवैध शस्त्र बाळगतांना अल्पवयीन संशयित पकडला जावा; हा या घटनेतला विचित्र योग म्हटला जात आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक-2021 व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नाशिक परिक्षेत्रचे पोलीस उप महानिरीक्षक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर एक इसम विना परवाना लोखंडी गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यांनी शहादा पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार दिपक गोरे, पोको मोहन ढमढेरे, पोको विजय ढिवरे यांच्या पथकाला माहिती देत पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर जावून संशयीत इसमाचा शोध घेतला. तेव्हा एका बंद कोल्ड्रींक्सच्या दुकानासमोर एक अल्पवयीन संशयित आढळला. पथकाने त्यास ताब्यात घेवून झडती घेतली असता 25 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक पिवळ्या धातुचे जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्याविरुध्द शहादा पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, पोलीस अमंलदार विजय ढिवरे यांनी ही कारवाई केली.