नंदुरबार- शहादा तालुक्यातील कहाटूळ येथील प्रसिध्द गीतगोपाळकार लक्ष्मण गोपाळ पाटील यांचे काल दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८५ वर्षे वयाचे होते. त्यांच्या संगीतमय गीत रामायणाचे १०११ प्रयोग झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रात ईतके विक्रमी प्रयोग झालेला कदाचित हा पहिला व एकमेव संगीत कार्यक्रम असावा. त्यांच्या परिवाराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या काळी रेडिओ वगळता अन्य कोणतेही करमणुकीचे आधुनिक प्रभावी माध्यम नव्हते व ज्या काळात टीव्ही देखील अस्तित्वात नव्हता, त्या काळी सर्व ग्रामीण जनतेत या संगीतमय श्रीकृष्ण कथा आणि रामायणाविषयी प्रचंड उत्सूकता असायची. आपल्या वडिलांकडून त्यांना हा वारसा मिळाला होता. शेकडोच्या संख्येने उपस्थित चाहत्यांमधे त्यांचे कार्यक्रम पार पडायचे. जनतेला सोप्या शब्दातून रामायणाचा बोध व्हावा, या हेतूने त्यांनी या सेवेला वाहून घेतले होते. संगित समर्पित जीवनाचा लाभ इतरांना करून देण्यासाठी ते सतत झटले. लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून संगीत गोपाळचे म्हणजे श्रीकृष्ण कथांचे १०११ प्रयोग त्यांनी केले मात्र एक रुपयाचेही मानधन अथवा बिदागी त्यांनी कधी स्विकारली नाही. सर्व कार्यक्रम मोफत विनामुल्य पार पाडले, अशी माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली. स्वत: गीत, संगित आणि गायनाचे जाणकार असल्यामुळे संपर्कातील अनेक मुलांना, तरुणांनाही त्यांनी गायन व संगित कलेची आवड लावली. अनेकांना शिकवले व उद्यूक्त केले. परिणामी कहाटूळ या लहानशा गावातील अनेक घरात गायन संगिताचे जाणते चाहते आढळतात शिवाय त्यांच्या मार्गदर्शनाने तयार झालेले तीनहून अधिकजण संगित विषारद उत्तीर्ण आहेत. सदा आनंदी हसतमुख व्यक्तीमत्व म्हणून पूर्ण पंचक्रोषित ते सुपरिचित होते. एक सुरेल गळा हरपल्याची व दु:ख झाल्याची भावना त्यांच्या आप्तस्वकीयांनी तसेच चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात वसंत लक्ष्मण पाटील, विजय लक्ष्मण पाटील, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.