नंदुरबार – गुजरात एटीएसने नवापुरातून पकडलेल्या कुख्यात गुन्हेगारचे आश्रयदाते कोण? या प्रश्नावर तसेच नवापूर भागात वाढलेल्या संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे रुजवणाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस दल टारगेटवर कधी घेणार? याही प्रश्नावर लोकांची एकच चर्चा रंगली आहे. याविषयी सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या टीकात्मक पोस्ट धुमशान करीत असतांनाच थेट राज्य स्तरावरील राजकारणाचा हा प्रमुख मुद्दा बनतो की काय, असे दिसू लागले आहे.
दरम्यान, याबाबत नवापूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिसनिरिक्षक भापकर यांच्याशी सायंकाळी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नवापूर शहरातून नव्हे तर रेल्वे स्थानकावरून त्यास गुजरात पथकाने पकडले आहे. तथापि आम्हाला या प्रकरणाची काहीही माहिती नाही. असा कोणता गुन्हेगार येथे पकडला याची अधिकृत कोणतीही नोंद नवापूर पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही, असे सांगून भापकर यांनी स्पष्ट केले की, अशा मोठ्या कारवाई प्रसंगी दक्षतेचा भाग म्हणून गुप्तता पाळावी लागते. गुजरात पथकाने म्हणून तसे केले असावे, ऩिरीक्षक भापकर म्हणाले.
संघटीत गुन्हेगारीतील कुख्यात व द ‘गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम ऍण्ड ऑर्गनाईज्ड क्राईम’ म्हणजे गुजसीटोक कायद्यांतर्गत ९ महिन्यांपासून हवा असलेला मोहम्मद अशरफ नागोरी मोहम्मद इस्माईल नागोरी (रा. रामपुरा, पास्तागिया शेरी, सुरत) नावाचा दहशतवादी जिल्ह्यातील नवापूर शहरात लपून बसलेला होता, हे गुजरातच्या एटीएसच्या छापेमारीनंतर रविवारी उघडकीला आले. यामुळे एकच खळबळ उडाली. ‘अली’ असे नाव धारण करून केशरचना बदलवून व दाढी वाढवलेल्या अवस्थेत नवापूर येथील मदरसा मधून तो रहिवास करत होता, अशी माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. गुजरातच्या वृत्तपत्रांना गुजरात एटीएसने दिलेली माहिती अशी की, अशरफ नागोरी अनेक संघटीत गुन्ह्यांप्रकरणी हवा होता आणि तो नाव बदलून वेशांतर करून सातत्याने शहर बदलवून लपत होता. सुरतच्या रामपुराभागातील रहिवासी हा अशरफ आणि त्याच्या टोळीतील प्रमुख 17 जण या पथकाच्या टारगेटवर आहेत. त्याच्या विरोधात मारामार्या,फसवणूक हत्येचा प्रयत्न, खंडणी तसेच आर्म्सऍक्ट अंतर्गत गुन्हे असे विविध 24 गुन्हे नोंद आहेत. २०१३ व १५ मधे पासा अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली होती. सुरत येथील ऍड.हसमुख लोढा यांच्यावर त्याने गोळीबार केला म्हणून त्याला ७ वर्षाची शिक्षाही झाली होती. अहमदाबादमधे दंगल घडवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. अशा सर्व कारणांनी सुरत येथून त्याला तडीपार केला होता. असे असतांनाही ९ महिन्यांपूर्वी सुरत येथे एका कारवाईत त्याच्याकडून ११ पिस्तोल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती व तेव्हापासून तो फरार होता.
दरम्यान, शनिवार दि.१९ सप्टेंबर रोजी रात्री नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात येऊन सुरत येथील पोलिस निरिक्षक सी.आर. जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुजरात एटीएसने येऊन विशेष मोहिम राबविली. तांत्रिक आणि मानवीय कौशल्याचा हुशारीने वापर करून आशरफला शोधून काढण्यात त्यांना यश मिळाले. न्यायालयाने त्याला 5 ऑक्टोबर पर्यंंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
असेही सांगण्यात येते की, काही महिन्यांपूर्वी अशरफ कोलकात्यात काही दिवस लपून राहिला. तिथून बनावट पासपोर्ट द्वारे बांगलादेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि तपासणी यंत्रणेमुळे त्याला ते जमले नाही. म्हणून राजकोट येथे काही दिवस लपला आणि नंतर नवापूर येथे येऊन राहिला, असे गुजरातच्या मान्यवर वृत्तपत्रांमधून प्रसारित झाले आहे. इतकी गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला गुन्हेगार नवापूरात लपल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुप्तहेरांना का मिळू शकली नाही? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
तसे नवापूर हे अनेक प्रकारच्या गुन्हेगारीमुळे अलीकडे प्रकाश झोतात येऊ लागले आहे. गुजरात व महाराष्ट्राच्या सिमेवरील हा भाग मद्य, लाकूड, वन्यप्राणी तसेच धान्य आणि गुटका तस्करांचे हब बनल्याची नेहमीच जाहीर ओरड होत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच नवापूर शहरात सुरत येथील एका व्यापाऱ्याचा कार मध्ये अनेक वार केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता व दारू तस्करांच्या टोळीने ते घडविल्याचे तपासात पुढे आले होते. गुटख्याची चोरटी वाहतूक जनावरांची चोरटी वाहतूक, मास तस्करी आणि काळ्याबाजारात नेले जाणारे धान्य, कंटेनर मधील रसायन चोरणाऱ्या टोळ्या हे विषय तर त्या भागात सामान्य लोकांच्या चर्चेत असतात. याच्या सूत्रधारांना पायबंद घालण्याचे काम आता तरी प्राधान्याने केले जावे तसेच अशरफ सारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे महाभाग कोण? त्यांचे लागेबांधे बांगलादेशपर्यंत असावेत का ? याचा शोध घेतला जावा; ही अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणाची थेअरी धुळ्यातील प्रकरणाशी मिळतीजुळती आहे. गोधरा हत्याकांड प्रकरणातील फरार प्रमुख आरोपी धुळ्यातील देवपुरात 2006 पासून नाव बदलवून राहत होता अनेक वर्षा नंतर तपासपथकाला तो सापडला होता. याकडे माहितगारांकडून लक्ष वेधले जात आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर नवापुरात झालेली कारवाई महाराष्ट्र पोलिस दलाच्या सतर्कतेवर आणि पर्यायाने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावून गेली आहे. याविषयी सोशल मीडियावर गुजराती वृत्तपत्रांच्या कात्रणांसह टीकात्मक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहेत.
सरजी… सुंदर आणि मार्मिक शब्दांत वार्ता लेखन!👌
अभिनंदन!💐
© प्रा.पुरुषोत्तम पटेल,