वाचकांचं मत :
गोमाता – एक वरदान
हिंदू धर्मामध्ये मनुष्या बरोबरच इतर प्राणी व वनस्पती यांचाही गौरव करून त्यांना पूजनीय केलेले दिसून येते. ज्या ज्या वनस्पती अथवा प्राण्यांची महती शास्त्रात सांगितली आहे किंवा त्यांची सेवा सांगितली आहे ते सर्व विज्ञानाच्या निकषावर मानवाला प्रचंड प्रमाणात विविध रूपाने ऊर्जा व इतर तत्त्व देतात हे सिद्ध झाले आहे. यातीलच एक उदाहरण म्हणजे गोमाता होय. गाईंना शास्त्रात पूजनीय व मातेसमान मानले आहे. गोसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा मानली आहे व गोमाता प्रदान करत असलेले पंचगव्य -दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचा अनेक प्रकारच्या रोगांच्या उपचारांसाठी उपयोग केला जातो. पुरातन चिकित्सा शास्त्राच्या ग्रंथांमध्ये महर्षी चरक, सुश्रुत, धन्वन्तरि, वाग्भट आणि अन्य अनेक आयुर्वेदाचार्यांनी लिहिलेल्या चिकित्साशास्त्राच्या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या रोगोपचारासंबंधी पंचगव्याचा उपयोग करत असल्याचे संदर्भ बघायला मिळतात.
गोमातेच्या दुधाचे गुणधर्म अमृतासमान गुणकारी आणि पचायला अत्यंत हलके आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (W.H.O.) मते 4.5 ते 5 टक्के एवढीच स्निग्धता मानवी शरीराला हितकारक आहे, त्यापेक्षा जास्त स्निग्धता ही मानवासाठी हानिकारक आहे. गाईच्या दुधामध्ये 3.5 ते 4 टक्के एवढीच स्निग्धता असते जी म्हशीच्या दुधात 5.5 ते 6.0 टक्के आहे. त्यामुळे गाईच्या दुधामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही व हृदयविकार होण्याचा धोका नसतो. गोमातेच्या दुधात सुवर्ण रंगाचे ‘कॅरोटीन’ असते. हे शरीरात सुवर्ण धातूंची पूर्तता करून हृदयाच्या कमकुवतपणा वर संरक्षक-कवच देते वैज्ञानिकांच्या मान्यतेनुसार गाईच्या 10 ग्रॅम तुपाची यज्ञात आहुती ही 1 टन पेक्षा अधिक ऑक्सिजन निर्माण करते. गोमातेच्या दुधापासून बनलेले दही आणि ताक पोटासाठी अमृत आहे. आयुर्वेदाने त्याला वात-पित्त-कफ शमन करणारे ‘त्रिदोषनाशक’ मानले आहे. हे सर्व पाहिले तर हा आरोग्यदायी वैज्ञानिक अभ्यास आपल्या पूर्वजांनी किती आधी केला आहे हे लक्षात येते व ते सर्व सामान्यांनी आचरणात आणून आरोग्यदायी जीवन जगावे म्हणून आपल्या धर्मात गोसेवेचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. तसेच आमच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात आमच्या पूर्वजांनी यज्ञ हवन करण्याला महत्त्व दिलेले दिसून येते. गाईच्या सहवासाने तणाव कमी होतो हे नुकतेच एका संशोधनानेही सिद्ध केले आहे.
ब्रह्मवैवर्तपुराण, खण्ड ४, अध्याय २१, श्लोक ८८ ते ९० मध्ये गोसेवेच्या माहात्म्याची चर्चा करतांना म्हटले गेले आहे,
तीर्थस्नानेषु यत्पुण्यं यत्पुण्यं विप्रभोजने ।
सर्वव्रतोपवासेषु सर्वेष्वेव तपःसु च ।।
यत्पुण्यं च महादाने यत्पुण्यं हरिसेवने ।
भुवः पर्यटने यत्तु वेदवाक्येषु यद्भवेत् ।।
यत्पुण्यं सर्वयज्ञेषु दीक्षया च लभेन्नरः ।
तत्पुण्यं लभते सद्यो गोभ्यो दत्त्वा तृणानि च ।।
अर्थात जे पुण्य तीर्थस्नानामध्ये आहे, जे पुण्य ब्राह्मणभोजन देण्यामध्ये आहे, जे पुण्य व्रते, उपवास आणि तपस्या यांद्वारे प्राप्त होते, जे पुण्य श्रेष्ठ दान देण्यात आहे आणि जे पुण्य श्रीहरिच्या अर्चनेमध्ये आहे, पृथ्वी प्रदक्षिणेने वेदवाक्यांचे पठण केल्याने जे पुण्य मिळते, तसेच यज्ञाची दीक्षा घेतल्याने जे पुण्य प्राप्त होते; ते पुण्य तर केवळ गोमातेला चारा देण्यामुळे त्वरित प्राप्त होते.’ ही गोसेवेची महती होय.
– डॉ० प्रणिता चिटणीस, संभाजीनगर