नंदुरबार – वाहन अडवून मारहाण करून जबरी चोरी केल्याच्या आरोपाखाली नंदुरबार तालुका पोलिसांनी काल दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी तीन गोरक्षकांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.
तथापि नंदुरबार शहरात एकही अधिकृत कत्तलखाना चालू नसताना कातडी व हाडे येथून बाहेरगावी कशी काय पुरवली जातात? असा प्रश्न करीत गोवंशाची कातडी, हाडे आणि शिंगे वाहून नेणाऱ्या वाहनांवर आणि व्यावसायिकावर कारवाई करण्याचा आग्रह धरला, म्हणूनच गोरक्षकांना कारवाईचे लक्ष बनवण्यात आले असून अवैध गोवंंश कत्तल करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे; असा आरोप गोरक्षकांच्या वतीने केतन रघुवंशी यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी गोवंशीय गुरांची कातडी भरलेली बोलेरो पिकअप नंदुरबारहून दोंडाईचाच्या दिशेने जात होता. परंतु वावद गावाच्या बस थांब्याजवळ बोलेरो पिकअप वाहनाला अपघात झाला. (विशेष असे की गो वंशीय गुरांची कातडी वाहून येणाऱ्या या बोलेरो पिकपवर “जय भवानी टेम्पो सर्विस” असे लिहिलेले आहे.) माहिती मिळाल्यामुळे काही गोरक्षक धावून आले. गोवंशाचे अवशेष वाहून नेणारे आणि या गोरक्षकांमध्ये वाद झाला. नंदुरबार शहरात अवैध कत्तल करून अशाप्रकारे अवैध कातडी वाहून नेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी शहानिशा केल्यानंतर गुन्हा दाखल करू असे सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी गोरक्षकांनी चौकशी केली तेव्हा प्रोसिजर चालू असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी कातडी सह वाहन सोडून दिल्याचे गो रक्षकांना समजले व त्यावरून ते संतप्त झाले. पुन्हा पोलीस ठाण्यात जाऊन गोरक्षकांनी कारवाईचा आग्रह सुरू केला. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी कातडी वाहतुकीची तसेच वाहनाची योग्य कागदपत्रे कुरेशी याने उपलब्ध करून दिल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यावरून गोरक्षक संतप्त झाले. म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पोलीस पथकासह तालुका पोलिस ठाण्यात आले. त्यांनी गोरक्षकांची समजूत काढायचा प्रयत्न केला. नंदुरबार येथे कोणताही अधिकृत कत्तलखाना सुरू नसताना एवढी कातडी नंदुरबार मध्ये येते कुठून? असा प्रश्न करून कातडीसह सदर वाहन ताब्यात घेण्यात यावे आणि सखोल चौकशी करण्यात यावी; अशी ठाम भूमिका गोरक्षकांनी घेतली.
अतिरिक्त अधीक्षक पवार यांनी यावर स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाचा आदेश लक्षात घेता कातडी व हाडे वाहून नेण्याला बंधन घालून तपासता येत नाही, तसेच संबंधित व्यापारी हैदराबाद येथून घाऊक दराने कातडी आणून किरकोळ स्वरूपात येथून विकत असतो. तसे अधिकृत कागदपत्र आज त्याने सादर केले म्हणून त्या व्यापार्यावर कारवाई होणार नाही; असेही विजय पवार यांनी स्पष्ट केले. या चर्चेदरम्यान विजय पवार यांनी गोरक्षकांना उद्देशून अवमानकारक भाषा वापरली असा गोरक्षकांचा आरोप आहे.
यानंतर म्हणजे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बोलेरो चालक जहांगीर शेख अहमद कुरेशी, रा. अब्दुल रज्जाक पार्क याची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. गोरक्षक भुषण पाटील, नरेंद्र पाटील आणि अन्य एक अशा तीन जणांविरोधात जबरी चोरीची कलमे लावून गुन्हा नोंदवण्यात आला. तालुका पोलीस ठाण्यात झालेल्या नोंदीनुसार जहांगीर शेख अहमद कुरेशी हा नंदुरबार जिल्हा रूग्णालयात आंतररूग्ण म्हणून दाखल होता व औषधोपचार सुरू असल्याने दि.25 रोजी त्याने फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 24 नोव्हेंबर 2021, रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान फिर्यादी हा त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्र. MH-०४ SD- २५७१ या गाडीतून मेलेल्या जनावरांची कातडी वाहून नेत असतांना भुषण पाटील, नरेंद्र पाटील यांनी आपसात संगनमत करून गाडीचा पाठलाग केला. गाडी समोर दुसरा ट्रक आल्याने वावद गावाच्या बस स्थानक जवळ फिर्यादीने गाडी थांबवली. तेव्हा या आरोपींनी दमदाटी करून शिवीगाळ केली तसेच हाताबुक्यांनी मारहाण करून रोख रक्कम ९००० रुपये जबरीने काढून घेतले, म्हणून जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कायदा मोडणारांचे जग आहे. लबाडांनाच पाठबळ मिळते. काही राजकीय बांड अशा अवैधधंदे करणारांची पाठराखण करतात. म्हणून सद्यस्थितीत सगळीकडे गोरखधंदे वाढत आहेत.
सत्ता, पैसा व कायदा मोडणारांचे संघटन व भ्रष्ट अधिकारी यांची साखळी असल्याने, फिर्यादीला आरोपी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
असाच अंधा कानून सुरु राहिल्यास लोक न्याय मिळवण्यासाठी कायदा हातात घेऊन रस्त्यावर येतील हे नक्की.