गोवाल पाडवी यांचा विजय म्हणजे सुप्त काँग्रेस लाट आणि महायुती मधील कोल्ड वॉर चा परिणाम ?

नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी हे 7 लाख 45 हजार 998 मते मिळवून विजयी झाले आहेत, तर भाजपाच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित या 5 लाख 86 हजार 878 मते मिळवून पराभूत झाल्या आहेत. गोवाल पाडवी हे एक लाख 59 हजार 120 इतक्या मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. आजचा हा धक्कादायक निकाल लागला असून देशभरात अचानक निर्माण झालेली काँग्रेसची सुप्त लाट इथेही चमत्कार घडवून गेली, असे म्हणता येईल. त्याचबरोबर महायुती मधील ‘कोल्ड वॉर’ परिणाम घडवून गेले अशी पण शंका व्यक्त होत आहे.
लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार तथा पंतप्रधानांच्या लाडक्या म्हटल्या जाणाऱ्या अभ्यासू खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदार उत्स्फूर्तपणे दणदणीत विजय प्राप्त करून देतील आणि त्यांच्या खासदारकीची हॅट्रिक मतदारच उत्स्फूर्तपणे घडवतील; ही खरे तर भाजपा प्रेमींची आणि मोदी प्रेमींची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या त्या अपेक्षांवर मोठ्या संख्येतील मतदारांनीच पाणी फिरवल्याचे आज झालेल्या मतमोजणीतून पुढे आले. एक अभ्यासू कल्पकतेने काम करणारा आणि राष्ट्रीय स्तरावर वलय प्राप्त केलेला सदस्य संसदेवर निवडून पाठवता आला नाही, हे येथील मतदारांचे दुर्भाग्य म्हणावे; अशा शब्दात भाजपा-प्रेमींकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याच्या उलट गोवाल पाडवीदेखील कल्पकतेने काम करून दाखवतील असा विश्वास काँग्रेस प्रेमी मधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, झालेल्या एकंदरीत मतांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, सहा विधानसभा क्षेत्रापैकी केवळ नंदुरबार आणि शिरपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांची जोरदार पाठ राखण करणारे मतदान झाले. अन्य चार विधानसभा मतदारसंघातून मात्र तसा पाठिंबा लाभला नाही. ज्या नंदुरबार विधानसभा क्षेत्रात खेळ खंडोबा होईल असा संशय व्यक्त केला जात होता त्याच ठिकाणी हिना गावित यांना अनुक्रमे 1 लाख 27 हजार 526 आणि शिरपूर विधानसभा क्षेत्रातून 1 लाख12 हजार 50 मते मिळाली. गोवाल पाडवी या दोन्ही ठिकाणी पिछाडीवर राहिले. परंतु याच्या उलट नवापूर, अक्कलकुवा, शहादा आणि साक्री विधानसभा मतदारसंघाने गोवाल पाडवी यांची जबरदस्त पाठराखण केली. महायुती मधील आजी माजीआमदार मंडळी कार्यरत असताना इथे हे कसे घडले? हा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे. या चारही विधानसभा क्षेत्राचे वैशिष्ट्य असे की,  मुस्लिम ख्रिश्चन मतदारांप्रमाणेच आदिवासींचे गठ्ठा मतदान काँग्रेसच्या बाजूने फिरलेले दिसते. ज्या नवापूर विधानसभा मतदार संघात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू माजी आमदार शरद गावित हे एक हाती कारभार सांभाळत होते शिवाय स्वर्गीय खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित देखील भाजपासोबत होते तर त्या ठिकाणी जोरदारपणे काँग्रेस कशी काय चालली? हा प्रश्न केला जातो कारण या ठिकाणी गोवाल पाडवी यांना चक्क एक लाख 44 हजारहून अधिक मते मिळाली. पहिल्या फेरीपासून 27 व्या फेरीपर्यंत नवापूर विधानसभा क्षेत्रात पाडवी अव्वल स्थानी राहिले.
वास्तविक एकीकडे खरोखरचे विकास कार्य आणि विकास व्हिजन लाभलेले हिना गावित यांचे वलयांकित व अभ्यासू नेतृत्व मतदारांसमोर होते. तर दुसरीकडे गावित परिवारा विरोधातील शक्तींवर आणि आरक्षण बचाओ सारख्या भ्रामक मुद्द्यांवर आधारलेले व सोशल मीडियाच्या लाटेवर स्वार झालेले गोवाल पाडवी यांचे नवखे नेतृत्व होते. यांच्यातील ही रंगलेली लढाई होती. मात्र आदिवासींचे आरक्षण जाईल, संविधान देखील बदलले जाईल, आदिवासींच्या जमिनी हिसकवल्या जातील, असा जो जोरदार अपप्रचार करण्यात आला, तो आदिवासी गट्टा मतदानाची विभाजन करून गेला, असे यावरून लक्षात येते. मतदारांनी अभ्यासू आणि वलायांकित नेतृत्व बाजूला ठेवून गोवाल पाडवी यांची कोरी पाटी का स्वीकारली? याचे उत्तर शोधताना नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुप्तपणे परिवर्तनाची लाट होती, हे निदर्शनास येते.
निवडणुका घोषित होण्याच्या प्रारंभी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या घराणेशाहीवर प्रचंड वादळ उठवण्यात आले होते. गावित परिवाराच्या कार्यापद्धतीवर विरोधकांनी एकत्र येऊन रान उठवले होते. त्यावरूनच राज्य स्तरावरील काही भाजपा नेत्यांना गावित समर्थक सुद्धा संशयाने पाहू लागले होते. महायुतीमध्ये रंगलेल्या या कोल्ड वॉर मुळे भाजपातील आणि इतर पक्षातील विरोधक एकत्र आले होते. शिवाय महागाई आणि बेरोजगारी सारखे मुद्दे लोकांनी हाती घेतलेले होते. या सर्वाचा एकंदरीत परिणाम मतपेटीवर दिसून आला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात रंगलेल्या भाजपा विरुद्ध काँग्रेस लढतीला असे अनेक मोठे कंगोरे आहेत. भाजपा कडून पंतप्रधान मोदी यांनी तर काँग्रेस कडून राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी नंदुरबार मध्ये सभा घेतलेल्या असल्यामुळे नंदुरबार च्या लढाईत अप्रत्यक्षपणे त्यांचीसुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला नंदुरबार लोकसभा मतदारसंघ दहा वर्षापासून भाजपाचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजपाच्या ताब्यात ठेवलेला आहे. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना विजयी करून काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे हे खरे महाविकास आघाडी समोरील आव्हान होते. त्यासाठी काँग्रेस कडून आरक्षण आणि संविधान बचावचा आधार घेण्यात आला. आदिवासी मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्यात काँग्रेस बऱ्यापैकी यशस्वी दिसली. यश मिळवून देणाऱ्या मतांमध्ये त्याचे रूपांतर करू शकली. अर्थातच माजी मंत्री के सी पाडवी, नवापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष कुमार नाईक, दिलीप नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत झटणाऱ्या संघटनांनी बजावलेली कामगिरी ही जादू घडवू शकली. हे पार्टी स्पिरिट भाजपाच्या बाजूने कुठेतरी कमी पडले हे देखील इथे स्पष्ट नमूद करावे असे वाटते.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!