नंदुरबार – पालिकेच्या इमारतींना करातून सूट देण्याची तरतूद आहे म्हणून तसा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे नाट्यमंदिर, सीबी गार्डन, इंदिरा मंगल कार्यालयाच्या कराची वसुली करण्याच्या प्रश्नच येत नाही. परंतु केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्हाला लक्ष बनवले जात आहे; असा खुलासा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
मी माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या संपर्कातील कोणा एका व्यक्तीचा देखील मालमत्ता कर माफ केला असेल तर दाखवून द्या. जाहीर फलक लावून पालिकेच्या मालकीच्या सीबी गार्डन नाट्यमंदिर व अन्य वास्तु भाड्याने देऊन कोटी कोटी रुपयांचे उत्पन्न घेत असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी अत्यंत खोटे सांगितले आहे. त्यांनी जे उत्पन्न दाखविले आहे त्याच्या निम्मे रक्कम त्यांनी मला द्याव्या, मी त्याचक्षणी त्या सर्व मालमत्ता कराराने त्यांना चालवायला देऊन टाकेन, असे जाहीर आव्हान देत रघुवंशी पुढे म्हणाले की, अशी दिशाभूल केली जात असल्यामुळे नुकसान नागरिकांचे होईल. त्यांना दंड व्याज कारवाईचा भूर्दंड नाहक सहन करावा लागेल. मग नागरिकांच्या वतीने हा भुर्दंड भाजपाचे पदाधिकारी स्वीकारतील का? असाही प्रश्न रघुवंशी यांनी केला.
पालिकेच्या मालमत्तेचा कर भरण्यात आलेला नाही, असे माहिती अधिकारात पालिकेच्या वतीने देण्यात आलेले ते पत्र म्हणजे पालिकेच्या एका कर्मचाऱ्याची झालेली चूक होती. 2017 पासून त्यावर खुलासा करीत आहे. 2018 साली ती चूक सुधारणारा ठराव करण्यात आला असून सीबी गार्डन इंदिरा मंगल कार्यालय छत्रपती नाट्यमंदिर वगैरे कोणत्याही मालमत्तेवर घरपट्टी आकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि भाजपाने बाबरी मशिदीचा मुद्दा अनेक वर्ष जिवंत ठेवला त्याप्रमाणे नंदुरबारची भाजपा एका चुकीच्या पत्राचा मुद्दा अद्याप लावून धरत आहे, असेही याप्रसंगी रघुवंशी म्हणाले.
नंदुरबार नगरपालिकेने घरपट्टी थकीत असलेल्या नागरिकांच्या नावांचे बॅनर शहरातील चौकाचौकात लावलेले आहेत. हा जनतेचा अपमान असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीने आंदोलन छेडले आहे. भाजपा नगरसेवकांनी चौका-चौकात कॉर्नर सभा घेणे सुरू केले आहे. पालिकेने थकबाकीदारांच्या याद्या फलकावर लावल्या परंतु पालिकेची मालमत्ता असलेल्या सीबी गार्डन नाट्यमंदिर इंदिरा मंगल कार्यालय आधी वास्तूंचा मालमत्ता कर भाडेकराराने चालवणाऱ्या संस्थांनी थकीत ठेवल्याचा आरोप भाजपाने केला असून थकबाकीदारांच्या यादीत यांची नावे का नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक दीपक दिघे, परवेज खान आदी उपस्थित होते.