नंदुरबार – यापूर्वी झालेल्या जातीय दंगलींना कारणीभूत दोन टोळ्यांमधील ३५ जण २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यातील दोन आरोपी नंदुरबार मध्ये राहत असल्याचे दिसून आल्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताबडतोब पकडून दोघांना हद्दपार केले तसेच पुन्हा गुन्हा नोंदवला.
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी तसेच गुन्हेगारांवर वचक रहावा याकरीता पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पाच गुन्हेगारी टोळीतील 35 आरोपींना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीतांना नंदुरबार जिल्हा बाहेर गुजरात राज्यात त्यांचे नातेवाईकांकडे सोडण्यात आले होते, परंतु त्यातील काही सराईत गुन्हेगार हे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांची कुठलीही परवानगी न घेता वावरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून तात्काळ कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एक स्वतंत्र पथक तयार करुन धडक कारवाई केली. त्यात हद्दपार आरोपी सिकंदर जाहिर खान कुरेशी रा. बिस्मील्ला चौक, नंदुरबार हा त्याच्या राहत्या घराच्या मागील शेडमध्ये व फिरोज जहीर कुरेशी रा. रज्जाक पार्क, नंदुरबार हा त्याच्या राहत्या घरी आज दिनांक १४/०१/२०२२ रोजी आढळले. म्हणून त्यांच्याविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अमंलदार आनंदा मराठे, यशोदिप ओगले, किरण मोरे, दिपक न्हावी, रमेश साळुंके यांचे पथकाने केली असून पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.