नंदुरबार – ओडिसा गुलाब चक्रीवादळाचा परिणाम होऊन जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या कोळदे (ता.नंदुरबार) येथील कृषि विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्रानेही दि. २८ व २९ सप्टेंबर २०२१ रोजी नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या कोळदे (ता.नंदुरबार) येथील कृषि विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्राने ही माहिती देतांना म्हटले आहे की, भारतीय हवामान विभाग यांचेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर गुलाब चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे चक्रीवादळ आज दि. २६ ला संध्याकाळी दक्षिण ओडीसा व आंध्र प्रदेशाच्या किनार्याला धडकले असून, याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त अंदाजानुसार दि. २८ व २९ सप्टेंबर २०२१ रोजी नंदुरबार जिल्ह्यात ब-याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार (मुसळधार) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह व जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या अनुषंगाने कृषि हवामान सल्ला देतांना सूचनाही केल्या आहेत. शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. परिपक्व झालेले पीक काढणी केलेले असल्यास ताडपत्री च्या सहाय्याने झाकून ठेवावे. भाजीपाला , सोयाबीन, कापूस इतर पिकामध्ये पावसाचे अतिरिक्त पाण्याचे निचरा होण्यासाठी चर काढावी व सदरील पिकामध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही अशी दक्षता घ्यावी. या दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांनी कीटकनाशक फवारणी, खत देणे इत्यादी कामे करणे टाळावे, असे म्हटले आहे. तुमच्या भागात विज पडण्याची पूर्वसुचना मिळवण्यासाठी दामिनी ऍप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini