जळगाव जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार ५७६ ग्राहकांकडे ६३० कोटी ३१ लाख रुपये
धुळे जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७५६ ग्राहकांकडे ३८६ कोटी ८० लाख रुपये
तर नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ८४० ग्राहकांकडे ३२४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी
एनडीबी न्यूज वर्ल्ड वृत्तसेवा
जळगाव – जळगावसह धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातही वीजबील थकवणार्यांचे वीज कनेक्शन कट करण्याची जोरदार मोहिम महावितरणने हाती घेतली असून घरोघर फिरुन वसुली केली जात आहे. अगदी ५०० रुपये जरी थकीत असतील तरी वीज तोडली जाईल शिवाय किमान ३५० रुपयांचा पुनर्जोडणीचा दंड ग्राहकाला भरावा लागेल. कोरोना स्थिती आणि वाढीव वीजबिलाने त्रासलेल्या ग्राहकांच्या संयमाची परीक्षा पहाणारी ही एकंदरीत स्थिती असली तरी ३५० रुपयांचा नाहक भुर्दंड टाळण्यासाठी तरी तत्परतेने वीजबील भरणे आता ग्राहकांना भाग पडणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील ५० लाख १९ हजार ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी सुमारे ३ हजार ५६२ कोटी रुपयांवर पोहचली आहे. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे; असे आवाहन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) प्रसाद रेशमे यांनी केले आहे. तर वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्याचे निर्देश देतानाच या कामात हलगर्जीपणा करणार्या अधिकारी व कर्मचार्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचा समावेश होतो. महावितरणच्या दरमहाच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणारा हा विभाग असून या विभागातील थकबाकीचा वाढता डोंगर महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्चासह, कर्मचार्यांचे पगार, वीज खरेदीसारख्या अत्यावश्यक बाबींसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. यासाठीच ५०० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणार्या २० लाख ७१ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून (२ हजार ९०९ कोटी रुपये थकबाकी) वसुली करावी अथवा त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून यात हलगर्जीपणा करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा निश्चित असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे.
नंदुरबार, धुळे, जळगावची इतकी आहे थकबाकी
जळगाव परिमंडलात ९ लाख ९६ हजार १७२ ग्राहकांकडे १ हजार ३४१ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
जळगाव जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार ५७६ ग्राहकांकडे ६३० कोटी ३१ लाख रुपये
धुळे जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७५६ ग्राहकांकडे ३८६ कोटी ८० लाख रुपये
तर नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ८४० ग्राहकांकडे ३२४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे.
विभागनिहाय अशी आहे थकबाकी
कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वर्गवारीतील ४३ लाख २४ हजार घरगुती ग्राहकांकडे ७३९ कोटी, ५ लाख २३ हजार व्यावसायिक ग्राहकांकडे ३०६ कोटी, १ लाख ४ हजार औद्योगिक ग्राहकांकडे ३७२ कोटी, २३ हजार ६४९ पाणीपुरवठा योजनांकडे ४९८ कोटी तर ४४ हजार ७५४ पथदिवे जोडण्यांचे १ हजार ६४६ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. भांडूप परिमंडलात १० लाख ३२ हजार ६१२ ग्राहकांकडे ५३७ कोटी, कल्याण परिमंडलात १३ लाख ३ हजार ७१८ ग्राहकांकडे ५५३ कोटी, कोकण (रत्नागिरी) परिमंडलात ४ लाख ६२ हजार ६९५ ग्राहकांकडे १३६ कोटी, नाशिक परिमंडलात १२ लाख २४ हजार ३१९ ग्राहकांकडे ९९५ कोटी आणि जळगाव परिमंडलात ९ लाख ९६ हजार १७२ ग्राहकांकडे १ हजार ३४१ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
संभाव्य गैरसोय टाळा
थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुर्ववत केला जात नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी अथवा इतराकडून वीज घणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आल्यास कायदेशिर व दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिल भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन सहव्यवस्थापकीस संचालक (प्र) श्री. रेशमे यांनी केले आहे.