नंदुरबार – संपूर्ण जगाचे लक्ष वेधून असलेल्या अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई कावीत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या ‘सकल हिंदू समाज’ आयोजित राम जानकी यात्रेत आणि बाईक रॅलीत हिंदुत्वासाठी कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी तसेच पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह नंदुरबार शहरातील शेकडो युवक युवतींनी सहभाग घेत प्रचंड प्रतिसाद दिला. महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वात महिलांनी आणि युवतींनी घेतलेला विशेष सहभाग या रॅलीतील आकर्षण बिंदू ठरला.
अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघी नंदनगरी भगव्या ध्वजांनी नटलेली दिसली. सदर बाईक रॅली चे आयोजन सकल हिंदू समाज अवध राम मंदिर निर्माण समिती, नंदुरबार द्वारे करण्यात आले. राम सीता लक्ष्मण यांचा जिवंत देखावा युवकांचा उत्साह द्विगुणित करताना दिसला. रॅलीत सहभागी होताना खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी राम जानकी रथाला भावपूर्ण नमन करून सर्व उपस्थितांना अयोध्येतील सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या रॅलीत सर्वधर्मिय, सर्वपक्षीय, सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील सर्व महिला आणि पुरुष कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. मोटारसायकलींवर लावलेले भगवे ध्वज, डोक्यावर केशरी टोप्या यासह केशरी रंगाची वेशभूषा हे रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे वैशिष्ट्य दिसले. शहरातील तळोदा रोडवरून निघालेली रॅली सिंधी कॉलनी मार्गाने उड्डाणपूल व तेथून सोनार खुंट, जळका बाजार, मोठा मारुती, अंधारे चौक, नगरपालिका मार्गे नेहरू पुतळापर्यंत काढण्यात येऊन त्या ठिकाणी रघुवंशी परिवाराच्या श्रीराम मंदिरजवळ रॅलीचे विसर्जन करण्यात आले. रॅलीत पाच हजारांपेक्षा अधिक वाहनधारक रॅलीत सहभागी झाल्याने चैतन्य निर्माण झाले होते. रॅलीतील वाहनधारकांसोबत रामाच्या वेषभूषेतील लहान बालकांनी लक्ष वेधून घेतले. शहरातील प्रत्येक रस्त्यावर जागोजागी तसेच बाईक रॅलीच्या मार्गावर देखील जागोजागी लावलेले भगवे ध्वज लक्ष वेधून घेत होते. नंदुरबार शहरातील मोदी ग्राउंड वरून खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. सुरू झालेल्या बाईक रॅली दरम्यान प्रत्येकाच्या हातात आणि प्रत्येकाच्या दुचाकी वर भगवे ध्वज फडकत होते. एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम या आणि अशा विविध घोषणांनी जणू शहर दुमदुमून गेले. रॅलीतील वाहनधारकांसोबत रामाच्या वेषभूषेतील लहान बालकांनी लक्ष वेधून घेतले. रॅलीत सहभागी होऊन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह विविध पक्षांचे नेते, संघटनांचे पदाधिकारी यांनीही जनतेचा आनंद द्विगुणित केला. रॅलीदरम्यान वाहतूक पोलिस, शहर पोलीस आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.