नंदुरबार – जलजीवन मिशन ठेकेदारांच्या सोयीसाठी चालविलेली योजना असून मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार आहे. घरकुलाबाबतही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खरे लाभार्थी वंचित राहताहेत. शिवाय, मागील दोन वर्षात नंदूरबार जिल्ह्यात सुमारे दीड हजारांहून बालमृत्यू व मातामृत्यू झाले आहेत. देश अमृत महोत्सवी वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीची रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असतांना येथील अशा अनेक समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत, असा घणघात करीत विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना जोमाने एकत्रित लढण्याचे आवाहन केले.
विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील हे आज नंदुरबार दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि विविध कार्यक्रम व भेटीगाठी असे या दौऱ्याचे स्वरूप होते. शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेऊन अजितदादा पवार यांनी चर्चा केली. ही या दौऱ्यादरम्यानची विशेष राजकीय घटना ठरली.
डॉक्टर अभिजीत मोरे यांचे
अजितदादा यांनी केले कौतुक
दरम्यान व्हीजी लॉन येथे दुपारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित दादा पवार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीवर समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थिती असतांना पक्ष संघटनासाठी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे करीत असलेल्या कामाचे कौतूकही केले. पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. येत्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीत देखील एकी ठेवावी लागणार आहे. यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात राष्ट्रीय नेत्यांना धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय? देशात व राज्यात नेमके काय सुरु आहे? असा सवाल उपस्थित करत कायदा आणि सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारपणे वागण्याचेही आवाहन अजित पवार यांनी केले. नंदुरबार जिल्ह्यात एक वेळ राष्ट्रवादीची मजबूत स्थिती होती. मात्र उलथापालथी होतात. यातूनच नवीन कार्यकर्ते तयार होत असून त्यांना संधी मिळाल्यास ते विकासाचा ध्यास घेतात. जिल्ह्यात राष्ट्रवादीची फळी मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावागावात बुथ कमिट्या तयार करुन सरकारच्या ज्या योजना दुर्गम भागात पोहचत नाहीत त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावात पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजेत. मध्यंतरीच्या निवडणूकांमध्ये काही जागा निवडून आल्या असल्या तरी त्यावर समाधान न मानता आणखी काम करण्याची संधी आहे, असेही अजित पवार म्हणाले.
हे 2 मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’ ला द्या : उदेसिंग पाडवी
राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार, शहादा-तळोदा या विधानसभा मतदार संघात सर्वे झाला असून त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार असल्याने राष्ट्रवादीसाठी या जागा देण्यात याव्या, अशी मागणी केली. तसेच रस्ते कामात मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात भ्रष्टाचार झाला असून त्याबाबत लक्षवेधी उपस्थित करुन संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली .
दरम्यान, प्रास्ताविक करतांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्ष संघटन मजबूत केले असून कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. कमी दिवसात राष्ट्रवादीची पुन्हा भक्कम स्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याने येत्या विधानसभा निवडणूकीत दोन जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. जि.प.सदस्य मोहन शेवाळे यांनी जिल्ह्यातील कुपोषण, स्थलांतर, बेरोजगारी असे विविध प्रश्न मांडत शहादा-तळोदा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्याची मागणी केली. याप्रसंगी नंदुरबार पालिकेचे माजी प्रतोद मोहन माळी तसेच सीमा सोनगीरे, तुषार सनंसे, सिताराम पावरा, दानिश पठाण, डॉ.जितेंद्र भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. कॉँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हा निरीक्षक नाना महाले, मधुकर पाटील, हितेंद्र क्षत्रिय, संदिप परदेशी, सुरेंद्र कुवर, डॉ.नितीन पवार, ॲड.अश्विनी जोशी, अल्का जोंधळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.