जलशुधदीकरणाचा खेळखंडोबा? नळातून येतंय दुर्गंधीयुक्त गाळमिश्रीत पाणी

नंदुरबार – शहराला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्यामुळे दीड महिन्यापासून नंदुरबार नगरपालिकेला डेड वॉटर म्हणजे मृत पाण्याचा स्त्रोत वापरावा लागत आहे. तथापि त्यामुळे सुरू झालेला गाळयुक्त पाणीपुरवठा अद्याप पर्यंत निरंतर चालू आहे. पालिकेने जलशुद्धीकरण करणे बंद केले काय? असा प्रश्न पडावा, इतपत दुर्गंधीयुक्त पाणी गाळ मिश्रित पाणी नागरिकांना माठात भरावे लागत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ खंडोबा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गांभीर्याने घ्यावा, ही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी रसायने, औषधी किंवा पावडर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून उपयोगात आणली जात असते. सध्या त्याचा वापर कमी होत असल्याचे घराघराात पोहोचणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे जाणवत आहे. पावसाचे दिवस लक्षात घेऊन आणि डेड वॉटरचा वापर लक्षात घेऊन योग्य मात्रेत त्या औषधांचा वापर केला जात आहे किंवा नाही; गाळून शुद्ध केलेले पाणी पुरवले जात आहे किंवा नाही; याची दक्षता पाणीपुरवठा विभागाने घ्यायची असते. धरणातील डेड वॉटर प्रमाणेच पाणीपुरवठा विभागाचा कारभारही डेड झाला काय ? असा  प्रश्न आता त्रस्त नागरिक करू लागले आहेत.
दरम्यान, पालिकेवर विसंबून न राहता अनेकांनी घरात आरो फिल्टर बसवून घेत, परस्पर सोय करून घेतली आहे. परंतु असंख्य नागरिक असे आहेत की, ते आरो फिल्टरचा वापर करत नाहीत. अशा नागरिकांसाठी फिरत्या गाडीद्वारे शुद्ध केलेले पाणी पुरवण्याची सोय नगरपालिकेतर्फे करण्यात आली होती. त्याचा ठेका शहाद्यातील संस्थेला देण्यात आला आहे. परंतु, संबंधित ठेकेदार नियमित सेवा देताना दिसत नाही. “प्रत्येक वसाहतीत डिझेल जाळत फिरणे आम्हाला परवडत नाही”, “निव्वळ चार दोन लोकांचा जार भरून देण्यासाठी आम्ही पगार खर्च करू शकत नाही”; असे सांगून संबंधित ठेकेदाराने ठेंगा दाखवणे सुरू ठेवले आहे. भर ऊन्हाळ्यातील प्रसंगात नागरिकांनी मागणी करून देखील एक्वा वॉटर पुरवणारे वाहन फिरलेच नाही. नंदुरबार नगरपालिकेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!