जवळच्या लोकांमुळेच भैय्यू महाराजांची आत्महत्या;   इंदूर कोर्टाने दिला मोठा निर्णय

इंदूर – संपूर्ण अध्यात्म क्षेत्राला आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्याला हादरवून सोडणाऱ्या भैय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी इंदूर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात इंदूर जिल्हा न्यायालयाने सेवक विनायक, चालक शरद आणि शिष्या पलक यांना दोषी ठरवले आहे. तिघांनाही प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वाद जगजाहीर झाला होता. पण तपासात असे काही सत्य बाहेर आले की,  भय्यू महाराज यांच्या जवळचे लोकच त्यांच्या जीवाचे शत्रू निघाले. भैय्युजी महाराजांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या विनायकचा उल्लेख केला तो विनायक तर भय्यूजींचा १६ वर्षांपासून एकनिष्ठ सेवक होता. पलक पुराणिकही एक शिष्या होती. महाराजांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर ही पलक शिष्या म्हणून आली होती. महाराजांशी तिची जवळीक वाढल्याने तिने लग्नाची स्वप्ने रंगवली होती, असे म्हटले जाते. इंदूरमधील भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी या तीन आरोपींना जानेवारी 2019 मध्ये अटक केली होती. त्यानंतर हे तिघे मिळून महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याचे समोर आले होते.
भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या तिघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी पैशांसाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. न्यायालयाने शिष्य पलक, शरद आणि विनायक यांना आयपीसी कलम ३०६ अंतर्गत दोषी ठरवले आहे.
12 जून 2018 रोजी संत भय्यूजी महाराज यांनी इंदूर येथील आश्रमात परवाना असलेल्या रिव्हॉल्वरने  गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या आत्महत्येने सर्वत्र खळबळ उडाली होती व संपूर्ण अध्यात्म क्षेत्र हादरले होते. आत्महत्येनंतर सहा महिने या प्रकरणी कुटुंबीय आणि आश्रमातील लोकांना कोणावरही संशय आला नाही.  मात्र केसमध्ये तपासअधिकारी बदलताच नवीन ट्विस्ट आले आणि धक्कादायक माहिती उघड होऊ लागली. भय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये ब्लॅकमेलिंगप्रकरणी सेवक विनायक, चालक शरद आणि शिष्या पलक तिघांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!