नंदुरबार – आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे चर्चेत आलेले पुलकित सिंग यांनी नंदुरबार नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदाचे शेवटचे दिवस देखील धडक कारवाईने गाजवून सोडले. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर शेजारील डोम म्हणजे मोकळ्या सभागृहाची जागा नाट्य मंदिराच्या ताब्यातून काढून घेत नगरपरिषदेच्या अधिकारात घेण्याची कारवाई त्यांनी आज केली. यामुळे ज्या संस्थेला नाट्यमंदिर चालवायला दिलेले आहे, त्या संस्थेला यापुढे त्या डोमचा वापर लग्न सोहळे आणि जेवणावळीसाठी करता येणार नाही, ते अधिकार आता नगरपरिषदेने स्वतःकडे घेतले आहेत.
मुख्याधिकारी यांनी आज एकू शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी एकूण 8 ठिकाणी मोठी कारवाई केली. त्यातील ही एक कारवाई आहे. डोम ताब्यात घेताना प्रवेशद्वारावर आधी नोटीसा चिटकविण्यात आल्या होत्या. त्यातील एका नोटीसीवर आज दिनांक 12 मे 2023 रोजी दहा वाजेपर्यंत ताबा देण्याचे सूचित करण्यात आले होते. नगरपरिषदेने कराराने ज्या संस्थेला छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर चालवायला दिले, त्या संस्थेशी झालेल्या करारात डोम वापरण्याचे अधिकार दिलेले नव्हते. त्याचा उल्लेख नोटीस मध्ये करण्यात आला आहे. यावर बोलताना मुख्याधिकारी पुलकित सिंग सांगितले की, नाट्यमंदिराला सील ठोकलेलं नाही तथापि डोमची ती जागा पालिकेच्या अधिकारात असल्यामुळे तिचे अधिकार पालिकेकडे घेण्यात आले. इथून यापुढे नगरपालिकेच्या माध्यमातून तिचा वापर करण्यात येईल; असे मुख्याधिकारी म्हणाले. वाहतुकीचा प्रश्न सुटावा म्हणून काही ठिकाणी पालिकेच्या अधिकारातील जुन्या इमारतींमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे तोच प्रयोग या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते डोमच्या जागेचा वापर पार्किंगसाठी करण्यात येईल का? या प्रश्नावर बोलताना पुलकित सिंह यांनी सांगितले की, अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही ती प्रक्रियेतील गोष्ट असल्यामुळे त्यावर बोलू शकत नाही.
दुसरी मोठी कारवाई श्रॉफ हायस्कूलवर करण्यात आली. 47 लाख रुपयांहून अधिक रुपयांचा मालमत्ता कर थकवला म्हणून श्रॉफ हायस्कूलला सीलबंद करण्यात आले. याबरोबरच काही हॉटेल्सह प्रतिष्ठित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान टाऊन प्लॅनिंग विभागाने ठरवून दिलेल्या आराखड्याबाहेर व नियमावली बाहेर जाऊन ज्यांनी इमारत बांधकाम अथवा जागेचा विस्तार केला, अशा 20 मालमत्ता धारकांना देखील त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. नंदुरबार शहरातील राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील बड्या प्रतिष्ठित व्यक्तींचा यात समावेश असल्याने तो सर्व व्हीआयपी वर्ग पुलकित सिंग यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे हादरला आहे.
पुलकित सिंग यांनी मुख्याधिकारी पदाची सूत्र घेतल्यापासून अवघ्या महिन्याभरात दोन कोटी रुपयांच्या थकीत मालमत्ता कराची धडाकेबाज पद्धतीने वसुली करून दाखवली. दोन लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकविलेल्या सर्व मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. गिरीविहार हाऊसिंग सोसायटीतील मालमत्ता धारकांचा देखील यात समावेश आहे, अशी माहिती त्यांनी आज दिली. नगरपालिकेचे अटल बिहारी वाजपेयी सभागृह बचत गटांना प्रशिक्षण केंद्र म्हणून चालविण्यास देण्यात आले. दरम्यान पुलकित सिंग यांची अक्कलकुवा पंचायत समितीचे बीडिओ म्हणून बदली झाली आहे. 15 मे 2023 पासून ते अक्कलकुवा येथे रुजू होतील.