जामनेर – गाईचा गोठा (शेड) बांधण्यासाठी मंजूर प्रकरणाचे बांधकाम सुरु करण्यासाठी कार्यादेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपये लाच घेतांना जामनेर पंचायत समितीचा लिपिक रंगेहात पकडला गेला. वसंत पंडित बारी असे अडकलेल्या लिपिकाचे नाव आहे. जामनेर पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगावच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील शेवगेपिंप्री येथील तक्रारदाराचे गोठा बांधणीचे प्रकरण मंजूर झाले होते. या बांधकामाचा कार्यादेश मिळवून देण्याकामी लाचखोर लिपिक वसंत बारी याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. सापळ्याची सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर लाचेची रक्कम स्विकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने बारी याच्यावर झडप घालत त्यास ताब्यात घेतले. डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजोग बच्छाव, पो.नि.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ,पो.ना.जनार्धन चौधरी,पो.कॉ.प्रविण पाटील,पो.कॉ.महेश सोमवंशी,पो.कॉ.नासिर देशमुख,पो.कॉ.ईश्वर धनगर,पो.कॉ.प्रदिप पोळ आदींच्या पथकाने हि कारवाई केली.