नंदुरबार : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कोविड कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात सॅम व मॅम बालकांचे स्क्रिनींगसाठी विशेष मोहिम राबवून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त बालकांचे स्क्रीनिंग केल्याबद्दल नंदुरबार राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला. महणून आज जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांचा मुंबईत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री ठाकूर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे हा सन्मान करण्यात आला. कोविड कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून 3 हजार 368 सॅम बालकांचे व 18 हजार 668 मॅम बालकांचे स्क्रिनींग केल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याची सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे.