नंदुरबार जिल्हा परिषदेत प्रलंबित कामांचा निपटारा वेगात
नंदुरबार – 1998 सली झालेल्या नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यातील शिक्षकांना प्रथमच निवडश्रेणी चा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. शिक्षण विभागात शिक्षकांच्या प्रश्नांबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने समन्वयक म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांची नियुक्ती केल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे,
याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा निर्मिती झाल्यापासून आजतागायत जिल्हा परिषद सेवेत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी (२४ वर्षे सेवेनंतरचा) लाभ मंजूर न झाल्याने वेळोवेळी तक्रारी प्राप्त आहेत . त्यानुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना २४ वर्ष सलग सेवेनंतर द्यावयाच्या निवडश्रेणी मंजूर करणेकामी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत . तथापि, निवड श्रेणी मंजूरीबाबत वरिष्ठ (चट्टोपाध्याय) वेतनश्रेणी मंजूर असलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या २० टक्के प्रमाणात निवडश्रेणी मंजूर करणेबाबत शासन आदेश आहेत . करिता जिल्ह्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना २४ वर्षाच्या सेवेनंतर अनुज्ञेय असलेली निवडश्रेणी मंजूरीकामी दि. ३० नोव्हेंबर २०२१ अखेर सेवेची १२ वर्ष पूर्ण करणाऱ्या व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आपल्या गटात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती विहित आराखड्यात दि . २२/११/२०२१ पूर्वी जिल्हास्तरावर सादर करावी, असे डॉ . युनुस पठाण समन्वयक तथा उपशिक्षणाधिकारी ( प्राथ . ) जिल्हा परिषद , नंदुरबार यांनी कळविले आहे.