नंदुरबार – भारताचा दैवी स्वर म्हटल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी पद्मविभूषण भारतरत्न लतादीदी यांची आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात प्राणज्योत मालवल्याचे वृत्त प्रत्येक कलारसिकांप्रमाणेच प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या मनावर आघात करून गेले आहे. अशातच अनेक लेखक, पत्रकार, संगीतकार, गायक, वादक विशेष लेख आणि गीत सादर करीत लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनीसुद्धा अत्यंत सुंदर असे लतादीदींचे रेखाचित्र रेखाटून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी काढलेल्या या रेखा चित्रात लतादीदींचे खास ठेवणीतले निर्मळ आनंदी शांत स्मित जसेच्या तसे रेखाटलेले पाहायला मिळते. लतादीदींच्या चेहऱ्यावरची सात्विकता देखील रेखाटण्यात ते यशस्वी झाले आहेत. पोलीस दला सारख्या कठोर मानल्या जाणाऱ्या विभागात असा सृजनशील कलाकार असू शकतो हे जाणून सर्वांना आनंदाचा धक्का बसला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी चित्रकलेतील अधिकृत कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. ही त्यांची उत्स्फूर्त कला व कसब आहे, हे विशेष.
लतादीदींच्या सुमधुर स्वरांनी आठ दशके अधिराज्य गाजवले. त्यांच्या प्रत्येक गाण्याने सामान्य माणसांच्या भावविश्वाला अत्यंत समृद्ध बनवले आहे त्यामुळे एका अर्थाने लतादीदींचे गाणे भारतीयांच्या या जीवनाचा अविभाज्य भागच नव्हे तर श्वास बनले आहेत. लतादीदींचा स्वर नसता तर? अशी साधी कल्पना देखील कोणी करू शकत नाही. परिणामी त्यांच्या जाण्याने व्यथित झालेला प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्तरावर आपापल्या पद्धतीने व्यक्त होत मनातील दुःखाला वाट करून देत आहे. सोशल मीडियातून शेकडो जणांनी आपल्या भावना आणि लतादीदींचे महात्म्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणारे लेख आणि टिपण्या व्हायरल करणे सुरूच ठेवले आहे. घराघरातून लतादीदींच्या गाण्यांची उजळणी करीत श्रद्धांजली वाहणे चालू आहे. अनेक संगीत वाद्य पथकांनी देखील लतादीदींचे गाणे सादर करून श्रद्धांजली वाहणे सुरू ठेवले आहे.
अप्रतिम,👌 सर आपला असाच छंद जपत रहा 🙏