नंदुरबार – जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, महिला अमलदार, आरोग्य विभागातील महिला अधिकारी व आशा वर्कर यांचा प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी कु. मिनल करनवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता तैनात असलेल्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना कोरोना विषाणुची लागण होण्याचा धोका असतांनाही ते कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर मात करुन पुन्हा कर्तव्यावर हजर देखील झाले. अशा कोरोना आजारावर मात करून पुन्हा सेवेसाठी कार्यरत झालेल्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 31 महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार, जिल्हा परिषद नंदुरबार येथील 23 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, शहादा तालुक्यातील 14 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, तळोदा तालुक्यातील 12 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील 51 महिला अशा एकुण 119 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील व त्यांच्या पत्नी श्रीमती रचना पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्रीमती वर्षा फडोळ, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, अतिरीक्त अधीक्षक अभियंता श्रीमती कोठारे, पोलीस उप अधीक्षक, आर्थीक गुन्हे शाखा आत्माराम प्रधान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना आपल्याला दिसतात. आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. अगदी एस.टी. बसची चालक ते नासा ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात महिलांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. आजची स्त्री पुरुषांप्रमाणेच आपल्या कुटूंबाचा आर्थिक भार उचलण्यात सक्षम बनलेली आहे. विवाह झालेली स्त्री सासर व आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून तिने निवडलेल्या क्षेत्रात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे, असे प्रतिपादन कु. मिनल करनवाल यांनी केले. महिला पोलीस अधिकारी व महिला पोलिसांचे देखील त्यांनी कौतुक केले.
दरम्यान, कोरोना महामारी दरम्यान आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे निभावणाऱ्या सर्वच शासकिय विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये या कार्यक्रमामुळे कर्तव्याप्रती निष्ठा व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याचे मत या सत्कारार्थींनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील व त्यांच्या पत्नी श्रीमती रचना पाटील, प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी, नंदुरबार कु. मिनल करनवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्रीमती वर्षा फडोळ, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अतिरीक्त अधीक्षक अभियंता श्रीमती कोठारे, पोलीस उप अधीक्षक, आर्थीक गुन्हे शाखा आत्माराम प्रधान यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.