ज्वारीच्या शेतातून साडे चार लाखाचा गांजा जप्त

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
नंदुरबार – धडगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागात एका ज्वारीच्या शेतात गांजाची झाडे लावलेली आढळून आली. पोलिसांनी छापा टाकून साडेचार लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करीत छोटे पणाने छुपेपणाने गांजाची शेती करणाऱ्या अटक केली आहे.
     पोलीस सूत्रांनी याविषयी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अमली पदार्थांबाबत विशेष मोहिम राबवून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी शोध घेतला. गुप्त बातमीदारामार्फत धडगांव तालुक्यात कंज्यापाणी गांव शिवारात शिलदार फाड्या पावरा याने त्याचे ज्वारी पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी त्यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे एक पथक व धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांचे दुसरे पथक हे कंज्यापाणी गावाचे जवळ असलेल्या डोंगराळ भागात पायी गेले. तेव्हा एका ज्वारीच्या शेतात पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपूर्ण 2.41 हेक्टर असलेली शेती पिंजून काढली असता तेथे 4 लाख 53 हजार 320 रुपये किंमतीची एकूण 127 गांजाची झाडे मिळून आली. संशयीत शिलदार फाड्या पावरा वय-55 रा. कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता. धडगांव जि. नंदुरबार यास व त्याच्या शेतात मिळून आलेले गांजाची झाडे पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. तसेच गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये धडगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
     ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, स्थानिक गुन्हे शाखेचे असई/ अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, रविंद्र पाडवी, मुकेश तावडे, पोलीस नाईक- गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, रमेश साळुंके, अविनाश चव्हाण, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, अभिमन्यु गावीत, दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी, धडगांव पोलीस ठाण्याचे राजेंद्र जाधव, राजेश्वर भुसलवाड, विनोद पाटील यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पथकाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!