झारखंड, गुजरातमधे छापेमारी करीत  गुन्हे शाखेने पकडले मोबाईल चोराला

     नंदुरबार-  10 महिन्यांपूर्वी न्याहली गावाजवळ मोटरसायकल स्वाराकडून लुटलेला मोबाईल झारखंडमधून तर आरोपी सुरत येथून पकडण्याची कामगिरी येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली. गुन्हा घडतो नंदुरबार जिल्ह्यात पण धागेदोरे सापडतात परराज्यात; असे अलिकडे बऱ्याच प्रकरणातून निदर्शनास आले आहे.
     या प्रकरणाची पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी संध्याकाळी ४ वा.च्या सुमारास नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक अशोक नवल धनगर, रा. गंधर्व नगरी, नंदुरबार हे त्यांच्या मोटार सायकलने दोंडाईचा गावाकडून नंदुरबारकडे येत असतांना न्याहली ता.जि. नंदुरबार या गावाजवळ दोन अज्ञात इसमांनी अडवले आणि अशोक नवल धनगर यांच्या खिशातील १४ हजार ५०० रुपये किमंतीचा मोबाईल जबरीने काढून घेतला. म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
     नंदुरबार जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने मोबाईलचे लोकेशन मिळवून एक पथक झारखंड येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झारखंड राज्यात जावून चोरी झालेला मोबाईल हस्तगत केला. तथापि हा गुन्हा सुरतमधील आरोपींनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. म्हणून पथकाने आपला मोर्चा गुजरात राज्यातील सुरतकडे वळवला आणि हितेश राजूभाई मेवाडा वय २६, रा. १४७, संत कृपा सोसायटी, गोडोदरा, ता. जि. सुरत यास ताब्यात घेतले. त्याने कबुली दिल्याने त्यास नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी पोलीस नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!