नंदुरबार – जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत केलेल्या कामांची बिले पास करून देण्याच्या मोबदल्यात वीस हजार रुपयांची लाच घेताना लघु पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच आज दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी हे अटक नाट्य घडले. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. सविस्तर माहिती अशी की, शहादा येथील तक्रारदाराने सन २०२२ सालात ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत लघु पाटबंधारे विभाग , जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत , शहादा तालुक्यात एकूण तीन कामे पूर्ण केली आहेत. नमूद तिन्ही कामांची रक्कम/बील काढून दिल्याच्या मोबदल्यात नंदुरबार पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे कनिष्ठ अभियंता दिनेश केशवराव पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण ९५,००० /- रुपयांची मागणी केली होती. यापैकी वेळोवेळी ७५,०००/- रुपये एवढी रक्कम पाटील यांनी या आधीच वेळोवेळी घेतली आहे. तरीही उर्वरित २०,०००/- रुपये एवढ्या रकमेसाठी पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी दरम्यान तडजोडी अंती १९,५००/- रुपये एवढी रक्कम कनिष्ठ अभियंता दिनेश केशवराव पाटील यांनी तक्रारदारकडून स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. तथापि तक्रार दाखल करून घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ठेवला होता. त्यानुसार आज दिनांक २५/०९/२०२३ रोजी कनिष्ठ अभियंता दिनेश केशवराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ १९,५००/- रुपये एवढी रक्कम पंचसाक्षीदारां समक्ष स्वीकारताच पथकाने कारवाई केली. सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक राकेश आ. चौधरी यांनी निरिक्षक माधवी वाघ , हवालदार विलास पाटील, ज्योती पाटील, अमोल मराठे, देवराम गावित पोना संदीप नावाडेकर, मनोज अहिरे यांनी हे कारवाई केली.