‘टाटा एअरलाईन्स’ ते ‘एअर इंडिया’ चा खडतड प्रवास !
‘एअर इंडिया’ हे सरकारी विमान वाहतूक आस्थापन आता टाटा समुहाने विकत घेतल्याचे वाचण्यात आले. वास्तविक पाहता वर्ष १९३२ मध्ये हे विमान वाहतूक आस्थापन ‘टाटा एअरलाईन्स’ या नावाने टाटा समुहानेच स्थापन केले होते आणि त्यावेळी ते एक प्रतिष्ठित आस्थापन होते. ते संपूर्ण आशिया खंडातील पहिले विमान वाहतूक आस्थापन होते. व्यवसाय ऐन भरात असतांना त्याचे वर्ष १९४६ ला बलपूर्वक सरकारीकरण केले गेले. वर्ष २००७ पासून गेली १४ वर्षे त्या आस्थापनाने उभारीच घेतली नाही आणि ते तोट्यात गेले असे सांगितल्या जाते. अशी कोणती उलथापालथ भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात झाली ते अजूनही गूढ आहे ? जेव्हा की याच काळात स्पाईसजेट सारखी अन्य खासगी विमान वाहतूक आस्थापने जोमाने व्यवसाय करत होती.
हे तुलनेत लहान असलेले आस्थापन कोरोना महामारी चालू होईपर्यंत नफा कमावत होते. असे असतांना सरकारी आस्थापनांना नेमके काय होते ? बरं, विमानात असेच कुणाला बसू देत नाहीत.
सर्व प्रकारच्या यंत्रणा हाताशी असतांना विमान वाहतूक आस्थापन तोट्यात कसे जाते ? सरकारकडील व्यवसायांत भ्रष्टाचार, पाट्याटाकूपणा यांमुळे जी राष्ट्रीय धनाची हानी होत होती, त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहून त्याचा भार पुन्हा जनतेलाच उचलावा लागतो. सरकारी आस्थापनांमध्ये कामाप्रती उदासीनता आणि सावळा गोंधळच आपल्याला बरेचदा दिसून येतो. नफ्यात असलेली आस्थापने कह्यात घेऊन ती दिवाळखोरीपर्यंत लयाला नेण्याचे कौशल्यच सरकारी महामंडळांनी अवगत केले आहे का ? असे वाटते. ही लाखाचे बारा हजार करण्याची वृत्ती सर्वत्रच दिसते जी देशाच्या प्रगतीला नक्कीच घातक आहे.