नंदुरबार – तालुक्यातील वावद ते रनाळे दरम्यान कापूस भरून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात वावद येथील युवा पोस्टमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 3 जानेवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली असून वावद गावावर शोककळा पसरली आहे. मात्र अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार रोजी दुपारच्या सुमारास वावद येथील गोपाळ भटू गवळी वय 38 हे आपल्या कामानिमित्त रनाळे येथे जात असताना दोंडाईचाकडून नंदुरबारकडे भरधाव वेगाने कापूस भरून येत असलेला ट्रक क्रमांक ( एम एच 18 BG 72 77 ) ने वावद येथील युवा पोस्टमन गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाल भटू गवळी यांची दुचाकी (क्र .एम एच 39 एए 4910) ला समोरून जबर धडक दिली. या अपघातात गोपाल या युवकाचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातात युवा पोस्टमनचा मृत्यू झाल्याची बातमी वावद गावात पसरताच गाव सुन्न झाले. घरातील कर्ता पुरुष अपघात आज अचानक ठार झाल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित नागरिकांना देखील अश्रू अनावर झाले. पोस्टमन गोपाळ गवळी हे अगदी मनमिळाऊ स्वभावाचे होते. अपघाताची माहिती होताच घटनास्थळी मित्र परिवार व गावकरी दाखल झाले. रनाळे व नंदुरबार येथे रुग्णवाहिकेला उपस्थित नागरिकांनी संपर्क केला असता मात्र अनेक तास उलटूनही रुग्णवाहिका उपस्थित न झाल्याने या गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. अखेर उपस्थित नागरिकांनीच गोपाल गवळी यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी अपघाताची नोंद नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत करण्यात आली. अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस शोध घेत आहेत.
स्थानिकांनी सांगितले की, गोपाळ हे अगदी मनमिळावू स्वभावाचे होते.कोणाच्याही सुखदुःखात हिरारीने पुढे राहायचे. अशा तरुणाचा अपघाती निधन झाल्याने त्यांचा मित्र परिवारावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोपाळ हे वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष होते. समाजाचे कुठलेही कार्य असो, अगदी मनापासून कार्य करीत असल्याने त्यांच्या निधनाने गवळी समाजासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.