नंदुरबार – जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या डाकीण प्रथेचे निर्मूलन करणार असल्याचा मानस पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी व्यक्त केला. इतर जिल्ह्याच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी असल्याचे पाटील यांनी सांगितले. दीपावली निमित्त प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी याप्रसंगी सांगितले की, गेल्या महिन्याभराच्या कालावधीत जिल्ह्यातील तालुकानिहाय पोलीस ठाणे यांचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने मुख्य वर्दळीच्या बाजार पेठ भागात पोलिसांची पायी संचलन मोहीम सुरू केली. यामुळे बाजार पेठ भागात महिलांची छेड काढणारे तसेच भुरट्या चोरांना आळा बसला. पोलिसांशी जनतेत सुसंवाद साधला जावा हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलातील काही पोलीस कर्मचार्यांचे व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन करण्याचे काम सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जनता संयमी आणि संवेदनशील असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. याच बरोबर नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील सर्वच अधिकारी व कर्मचारी देखील प्रामाणिकपणे व इमानेइतबारे कर्तव्य बजावत असल्याचे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.