मुंबई – जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमाविरोधात देशभरातून संताप उसळला असून मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. 13 देशांतून, 23 राज्यांतून, 400 गावांतून हिंदूंनी विश्वव्यापी आंदोलन केले तर 250 ठिकाणांहून सरकारला निवेदने देण्यात आली.
काय आहे ही परिषद ?
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी या माहितीत म्हटले आहे की, ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन जागतिक स्तरावर करण्यात आले आहे. हिंदू, हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्व या शब्दांची ऍलर्जी असलेल्या डाव्या विचारांचे, नक्षली विचारांचे असेच तथाकथित पुरोगामी विचारांची मंडळी जागतिक पातळीवर संघटित झाली असून या सर्वांनी मिळून हिंदुत्वाच्या विचाराचे उच्चाटन करण्याचे जागतिक स्तरावर षडयंत्र रचले आहे. त्यासाठी १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तथापि या हिंदुविरोधी कारस्थानाला तेवढ्याच पातळीवरून विरोध करीत जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनीही या परिषदेच्या विरोधात दंड थोपटले आहेत. ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या नावे एक जागतिक स्तरावर व्यासपीठ उभारण्यात आले आहे. याच नावाने ही परिषद होणार आहे. त्यासाठी मागील १५ दिवसांपासून सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा पद्धतशीरपणे वापर करून या परिषदेचा प्रचारप्रसार सुरु आहे. तसेच अधिकाधिक जणांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या परिषदेचे अमेरिकेतील ४० नामवंत विद्यापीठे हे सहप्रायोजक बनले आहेत. त्यामध्ये कोलंबिया विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, न्यू यॉर्क, चिकागो, कॅलिफोर्निया विद्यापीठ अशा विद्यापीठांचा समावेश आहे. त्याच बरोबर ८०० हुन अधिक उच्च शिक्षितांनी याला पाठिंबा दिला आहे. या परिषदेचे आयोजन करणाऱ्यांमध्ये नक्षली, डावे–साम्यवादी, सामाजिक कार्यकर्ते, ख्रिस्ती, मुस्लिम विचारवंत, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदी समाजघटकांचा समावेश आहे.
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी म्हटले आहे की, या विरोधात जगभरातून प्रतिक्रिया येत असून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. या कार्यक्रमाला भारतातून कम्युनिस्ट आणि साम्यवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते कविता कृष्णन, आनंद पटवर्धन, नलिनी सुंदर, नेहा दीक्षित, मीना कंदासामी आदी वक्ते संबोधित करणार असल्याचे, तसेच जगभरातील 40 हून अधिक विद्यापिठेही सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला होता; मात्र जगभरातील हिंदूंच्या जोरदार विरोधामुळे यातील अनेक विद्यापिठांनी ‘आमचा या कार्यक्रमाशी संबंध नाही’, असे घोषित करून या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे हे मोठे षड्यंत्र पहाता, या कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा, तसेच कार्यक्रमात सहभागी भारतीय वक्त्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जगभरातील हिंदूंनी आंदोलन केले. या विश्वव्यापी आंदोलनात 13 देशांतील, 23 राज्यांतील आणि 400 गावांतील हिंदूंनी सहभाग घेतला. तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून 44 ठिकाणी प्रत्यक्ष, तर 206 ठिकाणांहून केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री श्री. जयशंकर यांना ‘ऑनलाइन’ निवेदने पाठवण्यात आली. यामध्ये हिंदु जनजागृती समितीसह देशभरातील 32 हून अधिक हिंदुत्वनिष्ट संघटना आणि हिंदु धर्माभिमानी यांचा आंदोलनात सहभाग होता, असे समितीने कळविले आहे.
‘ट्वीटर’वरही विरोध; चालला जोरदार ट्रेण्ड !
या परिषदेच्या आयोजनामागे आयोजकांचा काय हेतू आहे , हे सांगण्यासाठी हिंदू जन जागृती समितीने ‘विशेष संवादा’ चे आयोजन केले होते. तत्पूर्वी ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाला ‘ट्वीटर ट्रेंड’वरही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे दिसून आले. या वेळी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, कॅनडा, ऑस्टे्रलिया, कतार, इंडोनेशिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आदी देशांतील हिंदूंनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी *#DGH_Panelists_Hindu_Haters* या ‘हॅशटॅग’चा वापर करून 81 हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले. परिणामी ‘ट्विटर’वर हा हॅशटॅग प्रथम स्थानावर होता. या हिंदुविरोधी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने *Hindujagruti.org* या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन पिटीशन’ ठेवण्यात आली आहे, याद्वारे 2750 हून अधिक लोकांनी इ-मेलच्या माध्यमातून सहभाग घेतला. ही पिटीशन *http://HinduJagruti.org/protest-dgh* या लिंकवर उपलब्ध असून अधिकाधिक हिंदूंनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही समितीने केले आहे.