धुळे – राजकीय ओढाताणीचे केंद्र बनलेल्या धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने सत्ता राखली आहे. अध्यक्षपदी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचा तर उपाध्यक्षपदी नंदुरबार जिल्ह्यातील दीपकबापू पाटील यांचा बहुमताने विजय झाला.
या निवडणुकीत संघर्ष पॅनलच्या वतीने अध्यक्षपदासाठी धुळ्यातील काँग्रेसचे शरद पाटील यांनी व उपाध्यक्ष पदासाठी अक्कलकुवा तालुक्यातील शिवसेनेचे आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केला होता. या मतदानात राजवर्धन कदमबांडे यांना 12 मते मिळाली, तर शरद पाटील यांना 5 मते मिळाली. याच प्रमाणे उपाध्यक्षपदाचे सर्वपक्षीय शेतकरी पॅनेलचे उमेदवार दीपकबापू पाटील यांना 12 मते मिळाली, तर आमशा पाडवी यांना 5 मते मिळाली. त्यामुळे संघर्ष पॅनलच्या शरद पाटील व आमशा पाडवी यांचा पराभव झाला.
दरम्यान निवड घोषित होताच बँकेच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यावर अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला.
अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे या प्रसंगी म्हणाले की, या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या आशीर्वादाने व त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे माझा विजय झाला असून बँकेला अ वर्ग दर्जा कसा मिळेल, त्यासाठी प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देतांना म्हणाले.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार अमरिषभाई पटेल, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील तसेच राज्याचे मंत्री के.सी. पाडवी यांनी प्रयत्न केले. पण माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रतिसाद दिला नव्हता. शेतकरी हिताचे निर्णय राबवले जावे यावर आग्रही राहून बँकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची भूमिका निभावण्यासाठी व प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधी पद आम्हाला उपयुक्त वाटते व शेतकरी सभासदांना त्या माध्यमातून न्याय मिळवून देत राहू; असे रघुवंशी यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. परिणामी आज मतदान घेण्यात आले.