नंदुरबार – धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माघारी नंतरच चित्र स्पष्ट होईल. सन्मानाने सर्वपक्षीय पॅनल तयार झाल्यास निवडणूक लढण्यास हरकत नाही. मात्र, प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच असेल; असे मत शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.
17 संचालकांच्या जागांसाठीची ही निवडणूक 21 नोव्हेंबर रोजी होणार असून उद्या बुधवार रोजी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी सुरू आहे. शनिवारी नंदुरबार जिल्ह्यातून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह राम रघुवंशी यांनी वि.का.सहकारी सोसायटी च्या गटातून नामांकन दाखल केले.
या पार्श्वभूमीवर रघुवंशी म्हणाले, महाविकास आघाडी झाली तर त्याच माध्यमातून निवडणूक लढविली जाईल. काँग्रेस महाविकास आघाडीच्या घटक पक्ष आहे. पालकमंत्री ॲड के.सी पाडवी व आ.कुणाल पाटील आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. आघाडी झालीच तर त्याच माध्यमातून निवडणूक लढवू. सन्मानाने सर्वपक्षीय निवडणूक लढविण्यास अडचण नाही. परंतु, प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच असेल असे स्पष्ट मत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले आहे.
आघाडीचा निर्णय मान्य; भाजपसोबत नाहीच
डीडीसीसीच्या विभाजनासाठी प्रयत्न कमी पडले. विभाजनानंतरच निवडणूक घेण्याची मागणी होती. बँकेची निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढवली जात असल्याने सहसा वरिष्ठ नेते यात दखल घेत नाहीत. महाविकास आघाडी नेत्यांना मान्य असून, जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.भाजप सोबत जायचे नाही असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.