नंदुरबार – भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या महा संसद रत्न डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रचंड उत्साह संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपाची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डॉक्टर हिनाताई गावित यांचा स्कार्फ देऊन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला. रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा देताना आपल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्यातील कार्य आणखी गतिमान होईल व शक्ती वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. डॉक्टर हिनाताई गावित यांच्या भाजपातील या दमदार पुनरागमनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले असून अनेक कार्यकर्त्यांनी आतशबाजी करीत आनंद व्यक्त केला.
डॉक्टर हिनाताई गावित यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेतील माजी सभापती हेमलता ताई शितोळे यांनी शहादा तालुक्यातील, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वळवी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील, तर सुभाष आप्पा पावरा यांनी धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंच आणि गाव पातळीवरील शेकडो कार्यकर्त्यांसह याप्रसंगी भाजपात प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी, हिरा पाडवी, महेश तवर आणि अन्य पदाधिकारी यांचा देखील प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांच्या गळ्यात स्कार्फ टाकून सत्कार आणि स्वागत केले. या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश पाडवी, नंदुरबार तालुक्याचे माजी अध्यक्ष जेएन पाटील, यांच्यासह अनेक पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर हिनाताई यांनी मानले आभार
प्रवेश सोहळ्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा एक वर्षांपूर्वी राजीनामा दिला होता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी केली होती परंतु आता पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी संधी दिली आणि पुन्हा प्रवेश दिला. त्यामुळे आज पासून मी भाजपाची कृतिशील कार्यकर्ता म्हणून कार्य करणार असून नंदुरबार जिल्ह्यातील संघटन वाढीस लावण्याचे लक्ष राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक तथा नेते आमदार डॉक्टर विजयकुमार जी गावित यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते, असे डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या.
डॉ. हिनाताई यांची थोडक्यात कारकीर्द
2014 या वर्षी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेऊन डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी पक्षीय राजकारणात पहिले पाऊल ठेवले. लगेचच त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. 2014 च्या त्या सर्वत्रिक लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून त्या प्रथमच खासदार बनल्या. नंतर 2019 च्या निवडणुकीत सुद्धा दणदणीत विजय मिळवून त्या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. खासदारकीच्या या दोन्ही टर्म चर्चेत राहिल्या. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार, युनोमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या पहिल्या आदिवासी महिला खासदार, लोकसभेत भाषण करून दिल्ली दरबारात प्रश्न मांडणाऱ्या नंदुरबारच्या पहिल्या खासदार, दहा वर्षाच्या कारकिर्दीत नंदुरबारच्या दुर्गम भागापर्यंत विकास योजनांचा विक्रमी लाभ मिळवून देणाऱ्या पहिल्या सक्रिय खासदार; अशा विविध विशेषणांनी ज्यांची ओळख सांगितली जाते, त्या महासंसदरत्न माजी खासदार डॉ. हिनाताई गावित विकासाभिमुख नेता कसा असावा याचे उदाहरण बनल्या आहेत. उत्कृष्ट संभाषण व वक्तृत्व कौशल्य लाभले असून डॉ. हिनाताई गावित यांनी खासदार असताना संसदेत अचूकपणे मुद्दे मांडून आपल्या वक्तृत्वाची वेगळीच छाप केंद्रातील मोदी सरकारच्या दरबारात निर्माण केली. डॉ.हिनाताईंच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा अनेकदा तोंड भरून कौतुक केले. उत्तम संसद पटू म्हणून ठसा उमटवल्यानेच संसद रत्न हा सन्मान त्यांना प्राप्त झालाच तथापि ही बिरुदावली कायमची प्राप्त झाली. केवळ एवढ्यावरच नव्हे तर खरोखरच्या जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या मनात आदराचे घर करून आहेत. आजही गरजू आणि अडचणीत असलेले नागरिक आपुलकी व अपेक्षेने आपल्या समस्या घेऊन डॉ.हिनाताई गावित यांच्याकडे येतात आणि त्या समस्यांचे अगदी अचूकपणे निराकरण करण्याची किमया डॉ.हिनाताई ह्या नेहमीच करून दाखवतात. डॉ. हिनाताई गावित यांनी आपल्या मतदार संघामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून ‘विकासाची गंगा’ आजतागायत अविरतपणे सुरू ठेवली आहे.
गद्दारीला कंटाळून दिला होता राजीनामा
खासदारकीची दहा वर्षाची कारकीर्द चमकदार राहिल्याने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने डॉक्टर हिनाताई गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. मात्र भाजपा महायुती मधील घटक पक्ष असताना सुद्धा शिंदे गटाच्या नेत्यांनी डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती आणि थेट बंडखोरीची भूमिका निभावली होती. परिणामी भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस उमेदवाराचा त्यावेळी विजय झाला होता. महायुती मधील या गद्दारी विषयी डॉक्टर हिना गावित यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे वारंवार म्हणणे मांडले होते. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा पुन्हा तसेच घडताना दिसले. म्हणून आक्रमक भूमिका घेत डॉक्टर हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे माध्यमांसमोर जाहीर करताना डॉक्टर हिना गावित यांनी म्हटले होते की, “नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित हे आहेत. असे असताना शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते यांनी गद्दारीची भूमिका सोडलेली नाही. म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून मी माझी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून महायुती मधील व पक्षातील शिस्तीचा भाग म्हणून तसेच राजकीय संकेत पाळून मी भाजपाच्या पदांचा राजीनामा पाठवत आहे.”



